तिरुअनंतपुरमच्या मैदानात न्यूझीलंडला पराभूत करत भारताने सलग आठवी द्विपक्षिय मालिका खिशात घातली. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना आठ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने आठ षटकात ५ बाद ६७ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला आठ षटकांमध्ये ६१ धावा पर्यंत मजल मारता आली.

अखेरच्या षटकात न्यूझीलंडला १९ धावांची आवश्यकता असताना कर्णधार विराट कोहलीने चेंडू हार्दिक पांड्याच्या हाती सोपवला. पांड्याच्या पहिल्या चेंडूवर मिचेल सँटनरने एक धाव घेत  कॉलिन डी ग्रँडहोमीला स्टाइक दिले. हार्दिक पांड्याच्या दुसऱ्या चेंडूवर डी ग्रँडहोमीने जोरदार प्रहार केला.  जोरात वेगाने येणारा चेंडू पकडण्यासाठी पांड्याने धडपड केली. यावेळी पांड्याच्या हाताला चेंडू जोरात लागला. चेंडू निर्धाव गेला असला तरी पांड्या आता गोलंदाजी करु शकेल का? असा प्रश्न विराटला त्याक्षणी पडला होता. सामन्यानंतर कोहली म्हणाला की, पांड्याला चेंडू लागल्यानंतर अखेरचे चार चेंडू मला टाकावे लागणार असेच वाटत होते. मात्र, पांड्याने या दुखापतीतून सावरत आपले षटक यशस्वीरित्या पूर्ण केले.

तत्पूर्वी पांड्याने पाचव्या षटकात अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवून दिला. न्यूझीलंडच्या डावातील पाचव्या षटकात त्याने  केन विल्यमसन धावबाद करुन न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा धुसर केल्या. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर चेंडू मिडऑनला खेळत विल्यम्सनने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पांड्याने थेट स्टंप्सवर निशाणा साधत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. भारताने हा सामना ६ धावांनी जिंकत मालिका खिशात घातली.