बेळगाव (कर्नाटक) येथे अपंगांच्या १५व्या राष्ट्रीय पॅरॉलिम्पिक चॅम्पियनशीप जलतरण स्पर्धेचे आयोजन पॅरॉलिम्पिक जलतरण असोसिएशन ऑफ कर्नाटक यांनी पॅरॉलिम्पिक जलतरण कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित केले होते. त्यात एकूण १७ राज्यातील अंदाजे ५०० अंध, अपंग आणि डान सिंड्रोम असलेल्या सबज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर गटातील मुलांनी भाग घेतला होता. यात महाराष्ट्र राज्यातील पॅरॉलिम्पिक जलतरण असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे ६२ अंध, अपंग आणि डाऊन सिंड्रोम यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये नागपूर जिल्ह्य़ातील सबज्युनियर गटात शश्रूती विनायक नाकाडे हिला ५० मीटर फ्री स्टाईल, ५० मीटर बॅक स्ट्रोक तसेच १०० मीटर ब्रेक स्ट्रोक या जलतरणाच्या प्रकारामध्ये ३ सुवर्ण आणि १०० मीटर बटरफ्लाय या जलतरणाच्या प्रकारात १ रौप्य पदक प्राप्त झाले आहे. तसेच महाराष्ट्र टिममध्ये खेळताना सुद्धा शश्रूतीला रिले या प्रकारात २ कांस्यपदके मिळालेली आहेत. सिनियर गटात मोहम्मद फैजान खुदाबक्ष यानेही जलतरणाच्या ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात १ सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. अशा अपंगांच्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये नागपूर जिल्ह्य़ाला या दोन अपंग मुलांकडून बहुमान प्राप्त झालेला आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा पॅरॉलिम्पिक जलतरण संघटनेचे अध्यक्ष रणजीत जोशी यांनी केले आहे.