22 July 2019

News Flash

बांगलादेशचा क्रिकेट संघ हल्ल्यातून बचावला!

न्यूझीलंडविरुद्धचा दौरा रद्द करून माघारी परतणार

न्यूझीलंडविरुद्धचा दौरा रद्द करून माघारी परतणार

न्यूझीलंडमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात बांगलादेशचा क्रिकेट संघ शुक्रवारी बचावला असून त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी हा हिंसाचार व हल्ला अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे.

मसजिद अल नूर या हॅगली पार्क भागातील मशिदीवर झालेल्या हल्ल्यात ४९ लोक ठार झाले असून बांगलादेशचा क्रिकेट संघ बसमधून उतरल्यानंतर या मशिदीत नमाजासाठी जाणार असताना हा गोळीबार झाला. बांगलादेशचा संघ यात सहीसलामत बचावला असून शनिवारी सुरू होणारी शेवटची व अंतिम कसोटी रद्द करण्यात आली आहे.

बांगलादेश क्रिकेट मंडळाने ‘ट्विटर’वर म्हटले आहे की, ‘‘बांगलादेश क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू ख्राइस्टचर्च येथे सुरक्षित आहेत. ते हॉटेलमध्ये परतले असून बांगलादेश क्रिकेट मंडळ त्यांच्या संपर्कात आहेत. हे क्रिकेटपटू न्यूझीलंडमधून लगेच पहिल्या विमानाने मायदेशी निघणार आहेत.’’

बांगलादेश क्रिकेट संघाचे व्यवस्थापक खलिद माशूद यांनी सांगितले की, आम्ही जे डोळ्यांनी बघितले, ते कधीही विसरू शकणार नाही. बांगलादेशच्या क्रिकेट चमूचे विश्लेषण करणारे भारतीय तज्ज्ञ श्रीनिवास चंद्रशेखरन यांनी सांगितले की, बंदूकधाऱ्या अतिरेक्यांच्या हल्ल्यातून आम्ही बचावलो आहोत. आम्ही घाबरलो होतो पण सहीसलामत वाचलो आहोत. बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल याने सांगितले की, अतिशय भयानक असा हा अनुभव होता.

‘‘हा आमच्या देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. असा हिंसाचार कधीच झाला नव्हता,’’ असे पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर बांगलादेश क्रिकेट चमूच्या खेळाडूंना सुरुवातीला बसमधून उतरण्यास मज्जाव करण्यात आला होता. पण काही मिनिटांनी ते हॅगले पार्क मैदानावर उतरले. नंतर त्यांना पुन्हा हॉटेलवर जावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह ऱ्होडस हे मैदानावर गेले होते, तर लिटन दास व नईम हसन हे खेळाडू हॉटेलवर परतले होते.

आम्ही सुदैवी ठरलो!

जर आम्ही तीन-चार मिनिटे आधी निघालो असतो, तर बहुधा आम्ही मशिदीतच असतो. तसे घडले असते, तर खेळाडूंच्या जिवालादेखील धोका असता. मात्र सुदैवाने आम्ही सर्व जण बचावलो; परंतु तेथील दृश्य हे एखाद्या चित्रपटाप्रमाणेच होते. रक्ताने माखलेले लोक मशिदीतून धावतपळत बाहेर येत असल्याचे ते दृश्य आमच्या अंगावर काटा आणणारे होते!   – खलीद माशूद, बांगलादेश संघाचे व्यवस्थापक

अत्यंत धक्कादायक! ख्राईस्टचर्च येथे झालेल्या या हल्ल्यात प्राण गमावणाऱ्यांसाठी सांत्वन व्यक्त करतो. बांगलादेश संघातील खेळाडूंनी सुरक्षित राहावे!   – विराट कोहली, भारतीय क्रिकेटपटू

आजपर्यंत मी अनेक दौरे केले आहेत. मात्र स्वत:च्या देशातच आपण सुरक्षित आहोत, असेच नेहमी वाटायचे; परंतु आजचा दिवस भयानक होता. हे अत्यंत घृणास्पद आणि विनाशकारी कृत्य असून त्याचे वर्णनदेखील मी करू शकत नाही!          – जिमी नीशाम, न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

पृथ्वीतलावर मनुष्यासाठी एकही सुरक्षित जागा नाही. कारण मनुष्यच येथे सर्वात धोकादायक आहे!  – रविचंद्रन अश्विन, भारतीय क्रिकेटपटू

न्यूझीलंडमध्ये घडलेली अतिशय हृदयद्रावक घटना. लोकांमधील माणुसकीला काय झाले आहे?  – रोहित शर्मा, भारतीय क्रिकेटपटू

अत्यंत धक्कादायक अशी घटना. हल्ल्याचा बळी ठरलेल्यांना माझ्याकडून श्रद्धांजली!    – मायकल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू

म्युनिक ते ख्राइस्टचर्च १९७२ म्युनिक ऑलिम्पिक

जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या ऑलिम्पिकदरम्यान झालेला हल्ला हा खेळावरील सर्वाधिक नृशंस हल्ला मानला जातो. त्या वेळी इस्रायलच्या ११ खेळाडू आणि प्रशिक्षकांना दहशतवाद्यांनी आधी कैद केले आणि नंतर मारून टाकले होते.

१९८७ न्यूझीलंडचा श्रीलंका दौरा

न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंका दौऱ्यावर असताना कोलंबोतील त्यांच्या हॉटेलजवळ प्रचंड मोठा बॉम्बस्फोट झाला. सुमारे ११३ नागरिक ठार झाल्याने न्यूझीलंडचा संघ पहिल्या कसोटीनंतरच दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला.

२००९ श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा

श्रीलंकेचा क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या खेळासाठी हॉटेलमधून बाहेर पडला. त्याच वेळी काही दहशतवाद्यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यांचे सहा खेळाडू जखमी झाले होते, तर सहा पोलीस आणि दोन नागरिक ठार झाले होते.

२००२ न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा

न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या हॉटेलबाहेरच बॉम्बस्फोट झाला. त्यात १२ नागरिक ठार झाल्यानंतर न्यूझीलंडने दौरा रद्द केला. २०१० आफ्रिकन नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धा आफ्रिकन नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेत टोंगो देशाचा संघ अंगोलियातून बसने जात असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने संघाचा सहायक व्यवस्थापक ठार झाला होता.

 

First Published on March 16, 2019 1:27 am

Web Title: 49 dead in terror attack at new zealand mosques