भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण, या गेला महिनाभर सुरु असलेल्या नाटकावर अखेर, काल मध्यरात्री पडदा पडला आहे. अपेक्षेप्रमाणे रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर भारताचा माजी गोलंदाज जहीर खान भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक बनलाय. तर राहुल द्रविड भारताच्या परदेश दौऱ्यात संघाचा फलंदाजी मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहे.

माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची अपमानास्पद गच्छंती झाल्यानंतर विराट कोहलीवर भारतीय क्रीडारसिक नाराज आहेत. सोशल मीडियावर अनेक वेळा विराटच्या हेकेखोर स्वभागावर नेटीजन्सनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोहलीने शास्त्रींसाठी लॉबिंग केल्याच्याही बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या. मात्र टीम इंडियाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत असताना रवी शास्त्री यांची कामगिरीही तितकीच उल्लेखनीय आहे. जवळपास १७ महिन्यांच्या कालावधीत शास्त्रींच्या नेतृत्वात भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यात काही परदेशातील सामन्यांचाही समावेश आहे.

१. भारताचा बांगलादेश दौरा, वर्ष २००७
bangladesh

विश्वचषकात मिळालेली अनपेक्षित हार, आणि ग्रेग चॅपल-सौरव गांगुलीचा वाद यांच्यानंतर रवी शास्त्री यांच्याकडे संघाच्या मुख्य व्यवस्थापक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विश्वचषकानंतर झालेल्या बांगलादेश दौऱ्यात रवी शास्त्रींनी टीम इंडियाची घडी पुन्हा बसवत संघाला विजय मिळवून दिला होता.

भारताने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. याचसोबत वन-डे सामन्यांमध्येही भारताने बांगलादेशला हरवत विश्वचषकातील आपल्या पराभवाचा वचपा काढला. शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मिळालेला हा विजय एक सकारात्मक उर्जा देणारा ठरला.

२. लॉर्ड्सवर कसोटी विजय, वर्ष २०१४
lords-test

२०१४ साली रवी शास्त्रींच्या टीम इंडियाने भारतीय संघाला एक सुखद धक्का दिला. लॉर्ड्स कसोटीत भारताने इंग्लंडवर मात करत मालिकेत आघाडी घेतली. भारतासाठी हा विजय ऐतिहासीक मानला जात होता.

मात्र यानंतर बाकीच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. कसोटी मालिकाही टीम इंडियाने ३-१ अशा फरकाने गमावली होती. मात्र लॉर्ड्सवर मिळालेल्या विजयामुळे भारतीय संघाच्या आशा नक्कीच पल्लवीत झाल्या होत्या.

३. वन-डे मालिकेत भारताची इंग्लंडवर मात, वर्ष २०१४
england-odi

कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभवाला सामोरं जाव लागल्यामुळे वन-डे मालिकेत भारताला चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं. आणि टीम इंडियाने क्रीडा रसिकांच्या अपेक्षांवर पाणी न फेरता वन-डे मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली.

वन-डे मालिकेत भारताने इंग्लंडवर ३-१ अशी मात करत परदेशात मालिका विजय संपादन केला. इंग्लंडसारख्या तुल्यबळ संघाविरोधात मिळालेला विजय हा भारतीय संघासाठी खास मानला जात होता.

४. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत मालिका विजय, वर्ष २०१५
africa

ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखाली भारतीय दौऱ्यावर आलेला आफ्रिकेचा कसोटी संघ हा प्रचंड आत्मविश्वासात होता. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा पराभव करुन आफ्रिका कसोटीत पहिल्या स्थानावर पोहचली होती. मात्र भारतीय खेळपट्टीवर शास्त्रींच्या टीम इंडियाने आफ्रिकेची दाणादाण उडवली होती.

या मालिकेपासून भारताचा विजयरथ जोरदार घौडदौड करायला लागला. कसोटी खेळणाऱ्या ९ देशांविरोधातल्या सामन्यात भारताने विजय संपादीत केला होता. आणि हा सर्व प्रवास रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखालीच सुरु झाला होता.

५. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका, वर्ष २०१६
bumrah

वन-डे मालिकेत ४-१ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत रवी शास्त्रींपुढे मोठं आव्हान होतं. याप्रमाणे संघात काही महत्वपूर्ण बदल करत शास्त्री यांनी जसप्रीत बमुराहला संघात जागा दिली होती. आणि रवी शास्त्रींची ही खेळी यशस्वी ठरली होती.

बुमरहाने या मालिकेत चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. ही मालिका भारतीय संघाने ३-० अशी खिशात घातली. ज्याचा फायदा भारताला आगामी मायदेशात खेळवल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकातही झाला.