आर्यलड
यंदाच्या विश्वचषकात त्यांनी तीन विजय मिळवत बाद फेरीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली होती, पण ते थोडक्यात अनुत्तीर्ण झाले. वेस्ट इंडिजला त्यांनी सुरुवातीलाच धक्का दिला. त्यानंतर झिम्बाब्वेसारख्या त्यांच्यापेक्षा अनुभवी संघाला त्यांनी पराभूत केले, तर अमिरातीच्या संघावरही त्यांनी विजय मिळवला. भारत आणि दक्षिण आफ्रिकासारख्या मातब्बर संघांकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानविरुद्धचा अखेरचा साखळी सामना त्यांनी जिंकला असता तर पहिल्यांदा बाद फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले असते, पण त्यामध्ये ते अपयशी ठरले.  गोलंदाजीमध्ये पॉल स्टर्लिग, अ‍ॅलेक्स क्युसॅक यांनी चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीमध्ये कर्णधार विल्यम पोर्टरफिल्डला उशिरा सूर गवसला असला तरी स्टर्लिग, एड जोयस, निल ओ’ब्रायन, केव्हिन ओ’ब्रायन यांनी चांगली फलंदाजी केली.

इंग्लंड
इंग्लंडचा संघ साखळी फेरीतून बाद फेरीत पोहोचण्यामध्ये अनुत्तीर्ण ठरला आहे. कागदावर बलाढय़ वाटणाऱ्या इंग्लंडच्या संघाला बांगलादेशकडूनही पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांनीही त्यांच्यावर सहज विजय मिळवला होता. अफगाणिस्तान आणि आयर्लंडवर विजय मिळवत त्यांनी फक्त चार गुणांची कमाई केली. जेम्स अँडरसन, स्टीव्हन फिन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन यांना अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नाही. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीचा परिणाम जाणवला नाही. फलंदाजीमध्ये इऑन मॉर्गन, इयान बेल, रवी बोपारा यांना अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नाही. जेम्स टेलर आणि जोस बटलर यांनाही कामगिरीत सातत्य दाखवता आले नाही. मोइन अलीने  चांगली गोलंदाजी केली असली तरी तो फलंदाजीमध्ये जास्त काही करू
शकला नाही.

अफगाणिस्तान
विश्वचषक स्पध्रेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या या संघाने फारसे प्रभावित केले नाही़  शमिउल्लाह शेनवारी वगळता या संघातील एकाही खेळाडूला स्पध्रेत छाप पाडता आलेली नाही़  जावेद अहमदी, नवरोज मंगल, असघर स्टॅनिकझाई, मोहम्मद नबी यांची साथ शेनवारीला मिळाली असती, तर त्यांच्याकडून धक्कादायक निकाल मिळाला असता, पण मोठी खेळी करण्यात त्यांना अपयश आल़े जलद मारा करणारे गोलंदाज असले तरी अनुभवाची कमतरता त्यांच्या खेळातून प्रकर्षांने जाणवत होती़  त्याचा जबरदस्त फटका त्यांना बसला़  शपूर झारदान, आफताब आलम, मिरवेस अश्रफ, हमिद हसन या गोलंदाजांना छाप पाडण्यात अपयश आल़े  श्रीलंकाविरुद्ध त्यांनी दाखवलेला झुंजारपणा पुढे कायम ठेवण्यात त्यांना अपयश आल़े  स्कॉटलंडविरुद्ध गोलंदाजांनी मात्र उल्लेखनीय कामगिरी केली.

संयुक्त अरब अमिराती
तिन्ही आघाडय़ांवर संयुक्त अरब अमिरातीने निराश केले असले तरी काही खेळाडूंनी आपली चमक दाखवली. शैमान अन्वरचा अपवाद वगळता मुख्य फलंदाजांना अपयश आले, पण तळाचे फलंदाज आपली भूमिका चोख बजावण्यात काहीसे यशस्वी ठरले. झिम्बाब्वे आणि आर्यलड या तुलनेने मजबूत असलेल्या या संघांविरुद्ध अमिरातीने अनुक्रमे २८५ व २७८ धावा काढल्या, ही बाब कौतुकास्पद आह़े गोलंदाजांच्या अपयशामुळे या लढती गमवाव्या लागल्या़  गोलंदाजीतही त्यांच्याकडे फार उत्तम कामगिरी करणारे खेळाडू नव्हतेच़  अजमल जावेद, मंजुला गुरूगे आणि मोहम्मद नावीद यांना प्रभाव पाडण्यात यश आल़े   क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणा त्यांना महागात पडला़  त्यांनी झिम्बाब्वे आणि आर्यलडला बऱ्यापैकी टक्कर दिली़  मुंबईकर स्वप्नील पाटीलचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे अर्धशतक लक्षवेधी ठरले.

स्कॉटलंड
 संलग्न देशांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्यात स्कॉटलंडचे नाव घेतले जाते. स्कॉटलंडची स्पर्धेत कधीही अत्यंत वाईट किंवा उल्लेखनीय अशी कामगिरी कधीच झाली नाही. कदाचित म्हणून सहापैकी सहा लढतींत त्यांचा पराभव झाला आणि प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. जोश डॅव्हे हा वेगवान गोलंदाज स्कॉटलंडचा चेहरा ठरला. साखळी फेरीअखेर सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत डॅव्हे अव्वल तीनमध्ये आहे. यावरूनच त्याच्या प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित होते. गटातील अन्य संघांनी सराव म्हणून स्कॉटलंडच्या लढतीचा उपयोग केला. नवख्या अफगाणिस्तानविरुद्ध झालेला पराभव स्कॉटलंडसाठी नामुष्कीचा ठरला. या लढतीत प्रथम फलंदाजी करताना त्यांना २१० धावांचीच मजल मारता आली व तेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. अनुभवी खेळाडूंचे अपयश स्कॉटलंडसाठी मारक ठरले.

झिम्बाब्वे
मर्यादित गुणवत्तेचे खेळाडू असूनही भारत आणि आर्यलडविरुद्ध त्यांनी केलेला खेळ कौतुकास्पद होता. मातब्बर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३४० धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना त्यांनी १ बाद १७० अशी मजल मारली होती. मात्र त्यानंतर त्यांची घसरगुंडी उडाली. आर्यलडच्या जॉन मूनीच्या वादग्रस्त झेलामुळे झिम्बाब्वेचा विजय दुरावला, तर भारताविरुद्ध सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीने विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. शेवटच्या आंतरराष्ट्रीय लढतीत ब्रेंडन टेलरने साकारलेली शतकी खेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. शॉन विल्यम्सने प्रत्येक सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली.  आतापर्यंतच्या विश्वचषकात झिम्बाब्वेची गोलंदाजी त्यांच्यासाठी महत्त्वाची असे. मात्र यंदा त्यांनी साफ निराशा केली. मोक्याच्या क्षणी त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडले आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले.