पाटणामध्ये झालेल्या ६१व्या अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील पुरुष विभागात पश्चिम विभागाच्या राजस्थानने प्रथमच विजेतेपदाला गवसणी घातली, तर महिलांमध्ये आपली परंपरा कायम राखत भारतीय रेल्वेने सलग २९व्या जेतेपदावर आपले नाव कोरले. महाराष्ट्राच्या महिलांना मात्र यंदा उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. तर पुरुष संघाला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला. गतराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला अंतिम फेरीत रेल्वेकडून अवघ्या एका गुणाने पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे यंदा हे जेतेपद आम्ही महाराष्ट्रात खेचून आणूच, अशा वल्गना सर्वानी केल्या होत्या. मग हे स्वप्न स्वप्नवतच राहिले. महाराष्ट्राला जेतेपद मिळवता आले नाही, परंतु अंतिम फेरीसुद्धा गाठता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ‘राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राची पीछेहाट’ हा प्रश्न ऐरणीवर आला. प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचे विश्लेषण केले. संघात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपदेखील झाले. याचा काही दिवस असाच धुरळा उडत राहील. राज्य संघटना आपल्या परीने चौकशी करेल. परंतु भविष्यात याचा महाराष्ट्राला फायदा होईल का?
एकंदर यंदाच्या दोन्ही संघांकडे दृष्टिक्षेप टाकला असता महिलांपेक्षा पुरुष संघाची तयारी उत्तम होती. महिलांचा संघ त्यामानाने कमी तयारीचा वाटला. त्यांची क्षेत्ररक्षणातील ‘डावी’ बाजू कमजोर होती. याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही. आपण बाजी मारून नेऊ, या भ्रमात सर्व जण राहिले. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली असती. पण नशिबाने दगा दिला. खरे तर या स्पर्धेत आपल्याला प्रतिस्पर्धी फारसे नव्हते. परंतु आपणच आपले प्रतिस्पर्धी ठरलो. यात आपणच आपल्या विजयाच्या मार्गातील अडथळा ठरत होतो. भारतीय संघात होणारी निवड, जेतेपद मिळल्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारी इनामाची घसघशीत रक्कम, सरकारी कोटय़ातून मोठय़ा हुद्दय़ाची व सन्मानाची नोकरी याला महत्त्व प्राप्त झाले. यातूनच मग वैयक्तिक कामगिरीकडे अधिक लक्ष दिले गेले आणि सांघिक कामगिरी ढासळली. कबड्डी हा सांघिक खेळ आहे. त्याचबरोबर आपला संघ अधिक वरच्या स्तरावर खेळला तर भारतीय संघात आपल्याला आपल्याच संघातील अधिक प्रतिस्पध्र्याशी सामना करावा लागेल. हे सर्व टाळण्यासाठी मग फक्त आपलीच तेवढी निवड यात कशी होईल, याकडे सर्व लक्ष केंद्रित केले जाते. त्याकरिता सर्व उपाय केले जातात. प्रसंगी संघाला पराभवाच्या गर्तेतदेखील ढकलले जाते. याचा फटका बसतो तो महाराष्ट्र संघाला व त्यात विजयी होण्यासाठी धडपडणाऱ्या प्रामाणिक खेळाडूंना.
राष्ट्रीय स्पर्धेत झालेल्या या पराभवानंतर प्रशिक्षक खेळाडूंवर आरोप करीत आहेत, तर खेळाडू प्रशिक्षकावर या दोषाचे खापर फोडत आहेत. असे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून आपण काय साध्य करणार आहोत? यातून आपण आपले दुबळेपणच दाखवून देत आहोत. असेच जर चालत राहिले तर कबड्डीचाहत्यांच्या विश्वासाला तडा जायला वेळ लागणार नाही आणि आज या खेळाला होणाऱ्या गर्दीला ओहोटी लागण्यास वेळ लागणार नाही. आज आपल्याला एका गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे. ‘राज्याने मला ही संधी उपलब्ध करून दिली. त्याच्याशी मी किती प्रामाणिक राहिलो? माझ्याकडे असलेले सर्वस्व मी या वेळी दिले का? की मी वैयक्तिक खेळ खेळलो? मी परिधान केलेल्या गणवेशाचा मला अभिमान वाटतो का? याची उत्तरे आपल्या मनाशीच शोधावी. यातून आपल्या मनाला जे उत्तर सापडेल, त्याच्याशी प्रतारणा न करता यापुढे त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. यातून आपल्याला जो खेळाडू सापडेल तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा खेळाडू असेल. स्पर्धेत हार-जीत ही असतेच. हरण्यात पण एक जिंकण्याची जिद्द दिसावयास हवी. तर महाराष्ट्र राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करेल यात शंकाच नाही.
महाराष्ट्राच्या पराभवाची कारणमीमांसा
*खेळाडूंची निवड ही जागेनिहाय व त्यांच्या वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरीवरून करावयास हवी.
*सर्वच संघांकरिता प्रशिक्षकाची नेमणूक करताना ती किमान तीन वर्षांकरिता करावी. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन ती वाढवावी किंवा नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती करावी.
*प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीकरिता वेगळ्या प्रशिक्षकाची नेमणूक करावी. खेळातील कौशल्य व डावपेच आखण्याचे कार्य प्रशिक्षक करील.
*राष्ट्रीय स्पर्धेच्या तारखेकडे डोळे न ठेवता आपण आपल्या राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची तारीख जाहीर करावी. त्यातून आपले संभाव्य खेळाडू निवडून खेळाडूंची छोटय़ा-छोटय़ा कालावधीकरिता तीन-चार वेळा शिबिरे कशी घेता येतील, याकडे कटाक्षाने लक्ष केंद्रित करावे. त्यातून खेळाडूंची मने जुळून येण्यास मदत होईल. यात किशोर व कुमार गटाच्या खेळाडूंकडे अधिक लक्ष केंद्रित करावे.
*व्यावसायिक संघाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे खेळाडू याकरिता उपलब्ध करून देण्याची विनंती करावी.
*महाराष्ट्रात स्पर्धा जास्त होतात. त्यामुळे खेळाडू थकतो किंबहुना जायबंदीदेखील होतो. त्या स्पर्धा कशा कमी होतील. तसेच ज्या होतील, त्या दर्जेदार कशा होतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. निदान आपल्या संभाव्य खेळाडूंनी तरी कमी स्पर्धा खेळून तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष केंद्रित करावे.