क्रिकेट इतिहासातील यशस्वी फलंदाजांपैकी एक असणारा भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा आज 46 वा वाढदिवस. मिस्टर डिपेन्डबल म्हणून ओळखला जाणारा राहुल ज्याप्रमाणे मैदानामध्ये जंटल मॅन आहे तसाच खऱ्याखुऱ्या आयुष्यातही. आपल्या संपुर्ण कारकिर्दीमध्ये एकाही वादामध्ये द्रविडचे नावाही आले नाही त्याची केवळ बॅटच बोलली. पण मैदानाबाहेरही द्रविडने अनेकांना मदत केली. पाहुयात असेच काही खास किस्से

द्रविडचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. त्यापैकी अनेकदा सांगितला जाणारा किस्सा म्हणजे द्रविडने आपल्या एका आजारी चाहत्याशी इंटरनेटच्या माध्यमातून मारलेल्या गप्पा. रक्ताचा कर्करोग झालेल्या नागपूरच्या अशोक ढोकेशी द्रविडने चक्क स्काइपवरुन गप्पा मारल्या. इतकेच नाही तर तो स्वत: अशोकला भेटायला येऊ शकला नाही याबद्दल त्याने दिलगीरीही व्यक्त केली. अशोकाच्या मित्रानेच हा संपूर्ण किस्सा क्वोरा या वेबसाईटवर सांगितला.

आपल्या चाहत्याशी स्काइपवर एक तास बोलला

आपल्या पोस्टमध्ये अशोकचा मित्र म्हणतो, ‘माझा मित्र अशोक हा द्रविडचा खूप मोठा चाहता होता. आम्ही क्रिकेट खेळताना तो द्रविडसारखे फटके मारण्याचा प्रयत्न करायचा. अचानक त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्याच्यावर उपचार सुरु असताना एकदा आम्ही त्याला रुग्णालयात भेटण्यासाठी गेलो. तेव्हा त्याची प्रकृती खूपच खालावली होती आणि त्या आजारातून तो बरा होण्याची शक्यता खूप कमी होती. आजारपणात त्याला बोलणेही शक्य नव्हते मात्र क्रिकेटचा विषय निघाल्यावर तो बोलायचा प्रयत्न करायचा. अशातच एकदा त्याने द्रविडशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही सर्व प्रकारे द्रविडशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण द्रविडकडून आमच्या सारख्या सामान्य लोकांना उत्तर येईल अशी अपेक्षा नव्हती. मात्र अचानक एक दिवस आमच्यापैकी एकला द्रविडच्या पत्नीचा विजिताचा कॉल आला. द्रविडने आमचे इमेल्स पाहिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच द्रविडल अशोकशी स्काइपवर बोलण्याची इच्छा असल्याचेही तिने सांगितले. द्रविडने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळेल की नाही याबद्दल आम्हाला शंका होती. मात्र खरोखरच द्रविडने स्काइपवरून अशोकशी गप्पा मारल्या. द्रविडने जवळजवळ एक तास अशोकशी मराठी भाषेत गप्पा मारल्या. त्या स्काइप कॉलनंतर अशोकच्या चेहऱ्यावर आलेले हसू आजही आमच्या लक्षात आहे.’

मानद पदवी नाकारली

बेंगळुरू विद्यापीठाने त्याला देऊ केलेली मानद डॉक्टरेट उपाधी नाकारली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट स्वीकारण्यास नकार दिला असून जेव्हा आपण क्रीडा क्षेत्रात संशोधन करू तेव्हाच ही उपाधी स्वीकारू असे त्याने म्हटले होते. अत्यंत नम्रपणे त्यांने आपला नकार विद्यापीठ प्रशासनाला कळवला. या नकारामुळे मात्र चाहत्यांच्या मनात त्याने आपला आदर आणखी वाढवला. अनेक सेलिब्रेटिंनी सोशल मीडियावर त्याच्या या नकाराचे मोठे कौतूकही केले.

मुलासाठी रांगेत उभा राहिलेला द्रविड

२०१७ साली नोव्हेंबर महिन्यामध्ये इंटरनेटवर राहुल द्रविडचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोत द्रविड आपल्या मुलांसमवेत विज्ञान प्रदर्शनात रांगेत उभा असलेला पाहायला मिळाला. चेहऱ्यावर कुठलाही आविर्भाव नाही किंवा आजूबाजूला सुरक्षारक्षकांचा गोतावळा नाही. एखाद्या सामान्य पालकांप्रमाणे तो रांगेत उभा असल्याचा फोटो एका खासगी ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आणि वाऱ्यासारखा पसरला. पुन्हा एकदा द्रविडच्या साधेपणाच्या किश्शांनी इंटरनेटच्या वॉल भरल्या. अनेकांनी केवळ हात जोडले तर काहींनी खासगी अनुभव, त्यांच्याकडे असलेले फोटो शेअर करत द्रविडच्या साधेपणाला सलाम ठोकला.

… आणि द्रविडने षटकार लगावला

आजही कसोटी क्रिकेट म्हटल्यावर भारतीयांच्या डोळ्यासमोर राहुल द्रविडच योतो. द्रविड म्हणजे उत्कुष्ट बचाव आणि संयमी खेळी. पण याच द्रविडने २००५ साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या एका कसोटीमध्ये समालोचक अरुण लाल यांना चुकीचे ठरवले होते.

कोलकत्ता येथे मालिकेतील दुसऱ्या कसोटीदरम्यान द्रविड फलंदाजी करत होता. पहिल्या दिवशी भारताची धावसंख्या २६१ ला २ विकेट्स अशी असताना द्रविड ८३ वर फलंदाजी करत होता. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज दिनेश कान्हेरीयाने द्रविडला एक पुढच्या टप्प्याच्या चेंडू टाकला आणि द्रविडने तो केवळ खेळून काढला. त्यावेळी समालोचन करत असणाऱ्या अरुण लाल यांनी नाही द्रविड हा चेंडू मारणार नाही असं म्हटलं. द्रविडची ही शैली नाही तो गोलंदाज त्याच्या आवडीचे चेंडू टाकण्याची वाट पाहतो आणि मगच फटके मारतो असं अरुण लाला म्हणाले. मात्र कान्हेरीयाने पुढचा चेंडूही तसाच टाकला आणि द्रविडने चांगलाच वचपा काढत थेट षटकार लगावला. तुम्हीच पाहा व्हिडीओ

सचिनची मिमिक्री

२०१२ मध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात द्रविडच्या हस्ते ‘सचिन बॉर्न टू बॅट – द जर्नी ऑफ क्रिकेट्स अल्टीमेट सेंच्युरियन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी द्रविडने त्याला संजय मांजरेकर यांनी सांगितलेला किस्सा सांगितला. चेन्नईमधील एका सामन्यामध्ये दक्षिण झोनविरुद्ध खेळताना उत्तर झोनच्या संघाकडे फिरकी गोलंदाज नसल्याने अडचणी येत होत्या. त्यावेळी मैदानामध्ये चर्चा करत असलेल्या मांजरेकर आणि रवी शास्त्रींची चिंता ऐकून सचिनने ‘मैं डालेगा’ (मी गोलंदाजी करतो) असं म्हटलं होतं.

तेव्हा सचिनला त्यांनी ‘क्या डालेगा?’ असा प्रश्न विचारला. सचिननेही लगेच, ‘कुछ भी चाहिये डालेगा. ऑफ स्पीन भी या लेंग स्पीन भी’ असं उत्तर दिलं.

द्रविडने हा किस्सा सांगितल्यानंतर सर्व उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला कारण द्रविडने चक्क सचिनची मिमिक्री केली. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक असलेल्या हर्षा बोगले यांनी द्रविड तुझे हे मैं डालेगा काही तासात युट्यूबवर दिसेल असं मत व्यक्त केलं. आज या व्हिडीओला ३१ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.

पिटरसनला केलेली मदत

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पिटरसन आणि राहुल द्रविड हे आयपीएलच्या दुसऱ्या पर्वामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुमध्ये एकत्र खेळ होते. आयपीएल20 डॉट कॉम या साईटवरील व्हिडीओमध्ये मी माझ्या फलंदाजीचे तंत्र सुधारण्यासाठी आणि ते अधिक प्रभावी बनवण्यासाठी राहुल द्रविडची मदत घेतली असे पिटरसन सांगताना दिसतो. द्रविडने मला एक इमेल केला होता त्यामध्ये त्याने माझ्या फलंदाजीमधील दोष सांगितलेले. या इमेलमुळे माझ्या फलंदाजीमध्ये मी योग्य तो बदल केल्याने मला फायदा झाला असंही पिटरसनने सांगितले होते.

‘द्रविडने मला माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये खूप मदत केली आहे. याचे सर्व श्रेय मी आयपीएलला देईल ज्यामुळे मला द्रविडबरोबर एकाच संघात खेळण्याची संधी मिळाली’, असंही पिटरसन म्हणाला होता.

पिटरसनने लिहीलेल्या त्याच्या आत्मचरित्रामध्येही त्याने द्रविडचा संपूर्ण मेल छापलेला.

मोहम्मद हाफीसबरोबरचा सेल्फी

पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद हाफीस आणि राहुल द्रविड एकदा एकाच विमानाने प्रवास करत होते. न्यूझीलंडला जाणाऱ्या विमानामध्ये अचानकच या दोघांची भेट झाली. १९ वर्षाखालील भारतीय संघाबरोबर विश्वचषक मालिकेसाठी द्रविड प्रवास करत होता तर त्याच विमानात पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी निघाला होता. अचानक झालेल्या या भेटीमुळे हाफिज भारावून गेला. त्याने ट्विटवर द्रविडबरोबरचा सेल्फी पोस्ट करत या भेटीची माहिती दिली. या ट्विटमध्ये हाफिज म्हणतो, ‘क्रिकेटमध्ये वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविड भाईला आज विमानात भेटलो. नेहमी क्रिकेटबद्दल बोलण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ही व्यक्ती तयार असते. त्याच्याविरुद्ध खेळाला मिळाले याचा मला अभिमान वाटतो.’

रिक्षातून फेरफटका

आयपीएलच्या सातव्या पर्वामध्ये राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज शेन वॉट्सन राजस्थान रॉयल्स या एकाच संघातून खेळत होते. त्यावेळी वॉट्सनने ट्विटवरुन एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये द्रविड आणि तो एका रिक्षामधून प्रवास करताना दिसत आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये वॉटसनने ‘द्रविड आम्हाला शहराचे दर्शन घडवत होता’ असं म्हटलं आहे. यात वॉटसनने सर्वोत्तम टूअर गाईड हा हॅशटॅगही द्रविडसाठी वापरला आहे.

द्रविड आणि ती जाहिरात

द्रविडला जॅमी या टोपण नावाने ओळखले जायचे. द्रविडची किसान जॅमची जुनी जाहिरात आजही अनेकांच्या लक्षात आहे.

अशा या बहुआयामी द्रविडला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.