“आता क्रिकेटचे सामने बघण्यात काही रसच उरला नाही. जराही उसंत घेत नाहीत हे खेळाडू. एक सामना झाला की लगेच दुसरी मालिका…यांचं गुर्हाळ सुरुच आहे. थकत कसे नाहीत हे खेळाडू, तेच समजत नाही.”

“२०१७ चा हंगाम भारतीय संघासाठी चांगला गेला असला तरीही भारताच्या यशात मला विशेष काहीच वाटत नाही. कारण संपूर्ण वर्षभरात भारत बहुतांश सामने हे घरच्या मैदानावर खेळला आहे, आणि काही ठराविक अपवाद वगळले तर एकदाही भारताला प्रतिस्पर्धी संघाकडून कडवी टक्कर मिळालेली नाही. त्यामुळे भारतीय संघाचा एकतर्फी विजय साजरा करण्यात मलातरी रस नाही.”

क्रिकेटला देव आणि धर्माचं रुप मिळणाऱ्या देशातील म्हणजेच भारतातील काही लोकांच्या या प्रतिक्रीया आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारताने काल २०१७ या वर्षातला आपला अखेरचा सामना खेळला. श्रीलंकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या या अखेरच्या टी-२० सामन्यात भारताने ५ गडी राखत सामना जिंकला आणि मालिकाही ३-० ने खिशात घातली. एकंदरीतच २०१७ हे वर्ष भारतासाठी चांगलं राहिलेलं आहे. काही ठराविक अपवाद वगळले तर भारताला या वर्षात फारसा पराभवाचा सामना करावा लागला नाहीये. मात्र इतक यश मिळूनही कुठेतरी भारतातील क्रिकेट चाहते नाखूश असल्याचं दिसतंय. चाहत्यांच्या या नाखुशीचं कारण ठरलं आहे, ते २०१७ या वर्षात भारतीय संघाने खेळलेलं ‘अतिक्रिकेट’.

२०१७ च्या जानेवारी महिन्यापासून भारतीय संघ अविरतपणे क्रिकेट सामन्यांची मालिका खेळतो आहे. यात त्याला चांगलच यश आलं आहे, मात्र या यशाचं एक कारण म्हणजे भारतीय संघाने मिळवलेले हे सर्व विजय हे आपल्या घरच्या मैदानावर मिळवलेले आहेत. ज्या मोजक्या क्षणी भारताला परदेशात जाऊन खेळण्याची संधी मिळाली, तिकडे त्यांना निर्भेळ यश संपादन करता आलेलं नाहीये. (अपवाद भारताच्या श्रीलंका दौऱ्याचा) २०१७ या वर्षात भारतीय संघाने खेळलेल्या मालिकांवर थोडक्यात एक नजर टाकूयात.

जानेवारी महिना, २०१७ –

१) भारत विरुद्ध इंग्लंड, वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका
वन-डे आणि टी-२० मालिकेत भारत २-१ च्या फरकाने विजयी

फेब्रुवारी महिना, २०१७ –

१) भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीत भारताचा विजय

फेब्रुवारी-मार्च महिना, २०१७ –

१) ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, ४ कसोटी सामन्यांची मालिका
भारत २-१ ने विजयी, (२०१७ वर्षातला भारताचा घरच्या मैदानावरचा हा पहिला पराभव ठरला होता)

भारताची चॅम्पियन्स करंडकातील कामगिरी –

१) साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मिळालेला पराभव वगळता भारताने आपलं वर्चस्व कायम राखलं.

२) अंतिम फेरीत मात्र भारताला पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता.

जुन-जुलै महिना, २०१७ –

१) भारताचा वेस्ट इंडिज दौरा, वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका
वन-डे मालिकेत भारत ३-१ ने विजयी. मात्र एकमेव टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजने भारताला पराभवाची धूळ चारली होती.

जुलै-सप्टेंबर महिना, २०१७

१) भारताला श्रीलंका दौरा, कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका
संपूर्ण दौऱ्यावर भारतीय संघाचं वर्चस्व. ३ कसोटी, ५ वन-डे आणि एकमेव टी-२० सामना जिंकत भारताने श्रीलंकेला त्यांच्यात मैदानावर ९-० अशी मात दिली होती.

१७ सप्टेंबर, २०१७
१) ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका
वन-डे मालिकेत भारत ४-१ ने विजयी. मात्र टी-२० सामन्यात भारताला १-१ अशी बरोबरी पत्करावी लागली होती.

२२ ऑक्टोबर, २०१७

१) न्यूझीलँडचा भारत दौरा, वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका
वन-डे आणि टी-२० मालिकेत भारताचा २-१ ने विजय

नोव्हेंबर-डिसेंबर, २०१७

१) श्रीलंकेचा भारत दौरा, कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका
कसोटीत भारत १-०, वन-डे मालिकेत २-१ तर टी-२० मालिकेत ३-० च्या फरकाने विजयी.

या आकडेवारीवर एकदा नजर टाकली की कोणाच्याही सहज लक्षात येईल, वर्षभरातले फार कमी महिने भारतीय खेळाडू आपल्या परिवारासोबत राहिले आहेत. एक मालिका संपते न संपते, तोच नवीन मालिकेची घोषणा होत गेली आणि खेळाडू सतत घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे खेळत राहिले. भारतीय संघाने कोणत्यासंघाविरुद्ध किती सामने खेळावे हा बीसीसीआयचा खासगी प्रश्न असला तरीही या वर्षभरात क्रिकेटच्या अतिरेकामुळे खेळाडूंवर येणारा ताण जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या दोन बातम्या पुरेशा आहेत.

अवश्य वाचा – बीसीसीआयने भारतीय संघासाठी विमान विकत घ्यावे- कपिल देव 

अवश्य वाचा – मलाही विश्रांतीची गरज आहे – विराट कोहली

“मी देखील माणूसच आहे, यंत्रमानव नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, भारतीय संघाच्या अतिक्रिकेटवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना आपली हतबलता व्यक्त केली होती. यानंतरही बीसीसीआयने विराटला लंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायला लावून वन-डे आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती दिली होती.” वर्षभरात प्रत्येक खेळाडू हा ४० सामने खेळतो. यात कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांचा समावेश असतो. यावेळी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारानूसार स्वतःचा फिटनेस राखायचा, खेळाचं तंत्र बदलायचं अशी तारेवरची कसरत खेळाडूला करावी लागते. या प्रक्रियेत खेळाडू मानसिक आणि शाररिकदृष्ट्या थकण्याची दाट शक्यता असते. बीसीसीआयच्या या व्यस्त वेळापत्रकाचा भारताच्या मुरली विजय, लोकेश राहुल या खेळाडूंना फटका बसला होता.

तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याशी सामना न होणं हे भारताच्या २०१७ या वर्षातल्या यशामागचं आणखी एक कारण मानलं जातंय. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजीचा सामना करताना परदेशी फलंदाज ढेपाळतात हा इतिहास आहे. याचाच प्रत्यय २०१७ वर्षात पहायला मिळाला. कसोटीत रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा या फिरकी जोडगोळीसमोर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात पुणे कसोटीत पत्करावा लागलेला पराभव पाहता भारतीय संघ प्रत्येकवेळा उजवा ठरला आहे. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत, प्रतिस्पर्धी संघाला सामन्यात एकदाही डोकं वर काढण्याची संधी दिली नाही.

मात्र २०१८ वर्ष भारतासाठी तितकसं सोपं राहणार नाहीये. कारण या वर्षात भारताचे बहुतांश सामने हे परदेशी भुमीवर होणार आहेत. यातील ५ जानेवारीपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे, आणि परदेशात भारतीय संघाची कामगिरी ही काही लपून राहिलेली नाहीये. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यात तुलना करताना स्मिथच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं. “विराट हा सध्याच्या घडीतला सर्वोत्तम फलंदाज आहे, मात्र कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथ विराटच्या तुलनेत सरस फलंदाज आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशात जो फलंदाज चांगली कामगिरी करतो, तो माझ्या दृष्टीने सर्वोत्तम फलंदाज आहे. कारण या चारही देशांमधल्या खेळपट्ट्या या विभीन्न प्रकारच्या आहेत. हा निकष लावायला गेल्यास विराटला परदेशी खेळपट्टीवर अजून चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे.” स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शेन वॉर्न बोलत होता.
आता भारताच्या परदेश दौऱ्यातील गेल्या काही वर्षांमधल्या कामगिरीवर एक नजर टाकूयात….

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वर्ष २००१-०२. (२ कसोटी सामन्यांची मालिका)
दक्षिण आफ्रिका १-० च्या फरकाने विजयी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वर्ष २००६-०७. (३ कसोटी सामन्यांची मालिका)
दक्षिण आफ्रिका २-१ च्या फरकाने विजयी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वर्ष २०१०-११. (३ कसोटी सामन्यांची मालिका)
मालिका १-१ ने बरोबरीत

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वर्ष २०१३-१४ (२ कसोटी सामन्यांची मालिका)
दक्षिण आफ्रिका १-० च्या फरकाने विजयी

 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वर्ष २००३-०४ (४ कसोटी सामन्यांची मालिका)
मालिका १-१ ने बरोबरीत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वर्ष २००७-०८ (४ कसोटी सामन्यांची मालिका)
ऑस्ट्रेलिया २-१ च्या फरकाने विजयी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वर्ष २०११-१२ (४ कसोटी सामन्यांची मालिका)
ऑस्ट्रेलियाकडून भारताला व्हाईट वॉश, ऑस्ट्रेलिया ४-० ने विजयी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वर्ष २०१४-१५ (४ कसोटी सामन्यांची मालिका)
ऑस्ट्रेलिया २-० ने विजयी

 

भारत विरुद्ध इंग्लंड, वर्ष २००२ (४ कसोटी सामन्यांची मालिका)
मालिका १-१ ने बरोबरीत

भारत विरुद्ध इंग्लंड, वर्ष २००७ (३ कसोटी सामन्यांची मालिका)
भारताने मालिका १-० ने जिंकली

भारत विरुद्ध इंग्लंड, वर्ष २०११ (४ कसोटी सामन्यांची मालिका)
इंग्लंडकडून भारताला व्हाईट वॉश, इंग्लंड ४-० ने विजयी

भारत विरुद्ध इंग्लंड, वर्ष २०१४ (५ कसोटी सामन्यांची मालिका)
इंग्लंड मालिकेत ३-१ ने विजयी

इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांविरोधात त्यांच्या देशातली भारताची ही कामगिरी पुरेशी बोलकी आहे. याचसोबत ही आकडेवारी हे देखील सांगते की भारतीय संघासाठी पुढचा काळ हा सोपा नसणार आहे. जलद खेळपट्ट्या, उसळणारे चेंडू आणि तेजतर्रार गोलंदाजांचा तोफखाना यापुढे भारताचे फलंदाज कसा तग धरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

याचसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतीय संघाचं जनमानसात नकारात्मक चित्र निर्माण झालं. त्यात भर म्हणून विराट कोहली-अनिल कुंबळे वादात कुंबळे यांना द्यावा लागलेला राजीनामा हा भारतीय संघासाठी काहीकाळ चांगलाच महागात पडला. एरवी क्रिकेटचा सामना म्हणला की टीव्हीला चिकटून बसणारे क्रीडाप्रेमी दुसऱ्या पर्यांयाचा विचार करायला लागले.

सुदैवाने प्रो-कबड्डी, हॉकी आणि बॅडमिंटनमधल्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने प्रेक्षकांना क्रिकेटला पर्याय मिळाला. प्रो-कबड्डीच्या ३ महिन्यांच्या कालावधीत, भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेऐवजी लोकांनी कबड्डीचे सामने पाहण्यास आपली पसंती दर्शवली होती. भारतीय चाहत्यांचा हा बदलेला ट्रेंड बऱ्याच गोष्टी सांगून जातो. जेवणाच्या पंगतीला बसलं की, दोन वाट्या बासुंदी पिऊन माणसाचं मन भरतं. मात्र सलग समोर बासुंदीच आली की त्या गोड पदार्थाचा विट यायला लागतो. याचप्रकारे २०१७ या वर्षात भारतीय संघाने मिळवलेले एकतर्फी विजय हे प्रेक्षक क्रिकेटपासून दूर गेल्याचं कारण ठरले आहेत. या कारणामुळे भविष्यकाळात भारतात क्रिकेटचं महत्वं कमी होईल का?, तर अजिबात नाही. मात्र आगामी काळात बीसीसीआय आणि आयसीसीने वार्षिक वेळापत्र (Future Tour Programme) आखताना या गोष्टीचा विचार केला नाही तर, सततचे एकतर्फी विजय आणि अतिक्रिकेटला कंटाळलेला प्रेक्षक खेळापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • प्रथमेश दीक्षित – prathmesh.dixit@indianexpress.com