महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता फेरीत भारतीय महिला संघाने थायलंडच्या संघावर ९ विकेट्सने दणदणीत विजय साजरा केला. संपूर्ण सामन्यात मिताली राजच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. भारतीय गोलंदाजांनी थायलंडला अवघ्या ५५ धावांमध्ये गुंडाळले आणि हे कमकुवत आव्हान भारताने १३ षटकांच्या आतच गाठले. भारतीय महिला संघाने पात्रता फेरीत दमदार कामगिरी दाखवून आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यात भारताची वेगवान गोलंदाज मानसी जोशी हिने ८ व्या षटकात थायलंडच्या फलंदाजाची घेतलेली विकेट सामन्याचे विशेष आकर्षण ठरली. मानसीने थायलंडची कर्णधार सोरनारिन टिपोच हिला क्लीनबोल्ड करून भारताला मोठे यश मिळवून दिले. २३ वर्षीय मानसीने अप्रतिम इन स्विंग टाकून टिपोच हिची विकेट घेतली. तिने आपल्या स्पेलमध्ये एकूण २९ निर्धाव चेंडू टाकले, तर तिला एकच चौकार ठोकला गेला. मानसीने घेतलेल्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून मानसीच्या गोलंदाजीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.