कुस्तीपटू सागर राणा हत्येप्रकरणी भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारने मंगळवारी रोहिणी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकलेल्या सुशीलवर दिल्लीच्या एका स्टेडियमवर कुस्तीपटूच्या हत्येत गुंतल्याचा आरोप आहे. सुशील बराच काळ फरार होता. आहे. या खुनाच्या घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देण्याऱ्याला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले. यानंतर सुशीलने जामिनासाठी अर्ज केला.

माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर राणाची नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. याप्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले होते. या प्रकरणातील सुशीलचा साथीदार अजय कुमार याची माहिती देणाऱ्यालाही ५० हजारांचे बक्षीस देण्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले आहे.

पोलिसांनी याआधी सुशील कुमारच्या घरावर छापा टाकला होता, मात्र तो तिथे नव्हता. त्यानंतर पोलिसांनी सुशील कुमार विरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केले होते. त्यानंतर देखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय?

४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर सुशील कुमार आणि त्याच्या काही सहकाऱ्यांचा सागर राणा याच्यासोबत वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामध्ये दोन जण जखमी देखील झाले. त्यामध्ये सागरला जास्त मार लागल्यामुळे त्याला रुग्णालायात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मॉडेल टाऊन परिसरातल्या एका फ्लॅटवरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सुशील कुमारने वेगळी भूमिका मांडली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फूटेजच्या मदतीने अधिक तपास सुरू केला आहे.