भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. अनेकदा या माध्यमातून खेळाडू आपल्या पाठीराख्यांशी संवाद साधत असतात. मात्र अनेकदा, या खेळाडूंना नेटीझन्सच्या ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजालाही अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र यावेळी जाडेजाने शांत न राहता, ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला जशास तसं उत्तर दिलं आहे.

 

रविंद्र जाडेजाने आपल्या नवीन हेअरस्टाईला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकत, आपल्या चाहत्यांची मत मागवली होती. यावर एका व्यक्तीने, जाडेजाला त्याच्या खेळाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. ज्यावर जाडेजानेही त्याला, मागच्या सामन्यातली माझी कामगिरी पाहिली नाहीस का? तुझ्या घरी टीव्ही नाहीये वाटतं, मूर्ख असं म्हणत सडेतोड उत्तर दिलं आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या जाडेजाला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात जागा मिळाली. या सामन्यांमध्ये जाडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमक दाखवली. 4 कसोटी सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकत भारताने ऑस्ट्रेलियन भूमीत इतिहास घडवला. शनिवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वन-डे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ कसोटी मालिकेतल्या निकालाची पुनरावृत्ती करतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.