क्रिकेट खेळात सुरू असलेले आयपीएल फिक्सिंग प्रकरणावर आयपीएलमध्ये कोलकाता संघाचे नेतृत्व करणारा गौतम गंभीरने अशा काही थोड्या वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे संपुर्ण क्रिकेटची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही असे म्हटले. त्याचबरोबर आजही असे अनेक क्रिकेटरसिक आहेत की जे, क्रिकेटवर प्रेम करतात आणि देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आर्वजुन उपस्थित असतात. असेही गंभीरने पुढे स्पष्ट केले.
सध्याच्या आयपीएल फिक्सिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या घडामोडींबद्दल गंभीर म्हणाला, “चिअरलीडर्सवर सामन्यांमध्ये बंदी घालणे हा काही यावर उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे अशा फिक्सिंगच्या घटना संपणार नाहीत. माझ्यामते हे सर्व काही वैयक्तीक पातळीवर अवलंबून आहे. तुम्ही कोणाही व्यक्तीला वैयक्तीकरित्या क्रिकेटमध्ये काही वाईट करण्यापासून थांबवू शकत नाही. असे काही करणे योग्य नाही ही भावना त्या व्यक्तीच्या मनात त्यावेळी येणे महत्वाचे आहे.” तसेच “आयपीएलही एक महत्वाची आणि गांभिर्याने खेळण्याची स्पर्धा आहे. मी जेव्हा कोलकाता संघात सहभागी झालो. तेव्हा, माझा संघ आयपीएलमध्ये कशी चांगली कामगिरी करेल याकडेच लक्ष देत होतो. पण, काही जणांचा आयपीएलकडे बघण्याचा दृष्टीकोन जर वेगळा असेल तर ते योग्य नाही. परंतु, असे काही जण आहेत आणि आपण त्यांना नियंत्रीत करु शकत नाही. फक्त अशा व्यक्ती आयपीएलपासून कशा दूर राहू शकतील याचे प्रयत्न आपण करू शकतो” असे गौतम गंभीरने स्पष्ट केले.