भारतीय महिला संघाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधानाने भारतीय महिला क्रिकेटसाठी आयपीएल स्पर्धा फायदेशीर ठरेल असं वक्तव्य केलं आहे. भारतामध्ये महिला क्रिकेटचा दर्जा हळुहळु सुधारतो आहे. पण अजुनही अनेक महिला खेळाडू आहेत ज्यांना योग्य संधी मिळत नाहीत, त्यांच्यासाठी आयपीएल सारखी स्पर्धा योग्य ठरेल. यामधून भारतीय संघालाही नवीन खेळाडू मिळू शकतील. बीसीसीआयही यासाठी प्रयत्न करत असल्याचं स्मृतीने सांगितलं, ती BBC Podcast मध्ये बोलत होती.

“बीसीसीआय महिला आयपीएलसाठी प्रयत्न करत आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही प्रदर्शनीय सामने खेळले, त्यानंतर ३ संघानिशी महिलांचं आयपीएल पार पडलं. भविष्यात अशा प्रकारच्या सामन्यांची संख्या वाढेल अशी मला आशा आहे. पाच-सहा संघांनिशी आयपीएल खेळवणं महिला क्रिकेटसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. विशेषकरुन विश्वचषकासारख्या स्पर्धेत या अनुभवाचा फायदा होऊ शकतो.” स्मृती मंधानाने आपली बाजू मांडली.

भारतात स्थानिक महिला क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांच्यात खूप मोठं अंतर आहे असंही मत स्मृतीने यावेळी व्यक्त केलं. स्थानिक पातळीवरील खेळाडूंना योग्य संधी मिळत नाही, ही दरी दूर करण्यासाठी आयपीएल सारखी स्पर्धा निश्चीत कामाला येईल असं स्मृती म्हणाली. २०१७ विश्वचषकानंतर भारतीय महिला क्रिकेटकडे अधिक सकारात्मक पद्धतीने पाहत असल्याचंही स्मृतीने सांगितलं. सध्या करोनामुळे लॉकडाउन काळात स्मृती आपल्या सांगलीतल्या घरी आहे.