रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये तुल्यबळ संघांचे आव्हान आमच्यासमोर असले तरी चांगली सुरुवात झाली तर विजय मिळविण्याचा मार्ग सुकर होतो, असे भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पी.आर. श्रीजेशने सांगितले.
ऑलिम्पिकमधील सलामीच्या लढतीत भारताची आर्यलड संघाशी गाठ पडणार आहे. या सामन्यात मोठा विजय मिळविण्याचे आमचे ध्येय असेल असे सांगून श्रीजेश म्हणाला, ‘२०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत आम्ही त्यांच्याशी खेळलो होतो. त्यानंतर आमची गाठ पडलेली नाही. प्रत्येक सामन्यानुसार आम्ही रणनीती आखणार आहोत. साखळी गटात पहिले चार क्रमांक मिळविणारे संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. साहजिकच अधिकाधिक सामन्यांमध्ये विजय मिळविण्याचे आमचे ध्येय आहे. ज्या प्रकारे आमची तयारी सुरू आहे ती लक्षात घेता साखळी गटात आम्हाला अग्रस्थान मिळू शकेल.’
तो पुढे म्हणाला की, ‘आमच्याकडून खूप चुका होत होत्या. आता मात्र आम्ही या चुका कमी करण्यात यश मिळविले आहे. गोल करण्यासाठी किंवा पेनल्टी कॉर्नर मिळविण्यासाठी सुयोग्य स्थिती कशी निर्माण करायची हे आम्ही सराव शिबिरात शिकलो आहे. बंगळुरू येथील सराव शिबिराच्या वेळी ३९.५ अंश तापमान आहे. १९३१ नंतर हे उच्चांकी तापमान आहे. या तापमानात खेळताना खेळाडूंना भरपूर घाम येतो व दमछाकही होत असते. आम्ही दररोज दोन तास सराव करीत आहोत. आम्हा गोलरक्षकांना मात्र तीन सत्रांत सराव करावा लागतो. सरावाच्या वेळी पेनल्टी कॉर्नरद्वारा होणारे गोल कसे रोखायचे याचे प्रशिक्षण आम्ही घेत आहोत.’
तो पुढे म्हणाला, ‘पदक मिळविणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. लंडन ऑलिम्पिकमध्ये आमची संधी हुकली. मात्र यंदा आम्ही पदक मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू.’