पाच वर्षांत ग्रँडस्लॅम खेळणारा तिसरा भारतीय टेनिसपटू

आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरन याने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याचा मान पटकावला आहे. चेन्नईच्या २९ वर्षीय प्रज्ञेशने पात्रता फेरीच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात जपानच्या योसूके वाटानुकी याचा ६-७ (५), ६-४, ६-४ असा पराभव करत मुख्य फेरीत स्थान मिळवले.

गेल्या पाच वर्षांत ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळणारा प्रज्ञेश हा तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे. याआधी सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरीने हा मान पटकावला होता. युकीने २०१८ मध्ये चारही ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये खेळण्याची किमया केली होती. मात्र दुखापतीमुळे त्याच्या उंचावणाऱ्या कारकीर्दीला खीळ बसली. २०१३च्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत खेळणाऱ्या सोमदेवने आता निवृत्ती पत्करली आहे.

पात्रता फेरीचे तीन सामने जिंकून प्रज्ञेशने २० लाख रुपयांची रक्कम मिळवली असून मुख्य फेरीत पहिल्या फेरीत पराभूत झाला तरी त्याला किमान ३८ लाख रुपये मिळणार आहेत. प्रज्ञेशला मुख्य फेरीच्या पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ३९व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफो याच्याशी लढत द्यावी लागेल. पहिल्या फेरीचा अडथळा पार केल्यास, प्रज्ञेशसमोर पाचव्या मानांकित आणि विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या केव्हिन अँडरसनचे आव्हान असेल.

ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळणे हे माझे स्वप्न होते. ते आता साकार होणार आहे. मला किती आनंद झाला आहे, हे शब्दांत सांगता येत नाही; पण माझ्यासाठी ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. इथपर्यंत मजल मारण्यासाठी बराच उशीर झाला असला तरी माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता थोडी विश्रांती घेऊन मी मुख्य फेरीसाठी सज्ज होणार आहे.   – प्रज्ञेश गुणेश्वरन, भारताचा टेनिसपटू