आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या अंबाती रायुडूने आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध सलामीच्या सामन्यात रायुडूने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. २०१९ विश्वचषकात भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या रायुडूने निवृत्ती जाहीर केली होती. पहिल्याच सामन्यात ४८ चेंडूत ७१ धावा केल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी माजी निवड समितीप्रमुख एम.एस.के. प्रसाद यांना ट्रोल केलं. चेन्नई संघातील रायुडूचा साथीदार शेन वॉटसन याच्या मतेही विश्वचषक संघात रायुडूला स्थान न मिळणं हा भारताचाच तोटा होता.

“अंबाती अतिशय गुणावन खेळाडू आहे. माझ्या मते वन-डे संघात विश्वचषकासाठी जागा न मिळणं हा भारतीय संघाचा तोटा होता. पहिल्या सामन्यात जिथून धावा मिळवणं शक्य होतं तिकडे व्यवस्थित फलंदाजी करुन रायुडूने चेन्नईचं आव्हान कायम राखलं.” एका यु-ट्यूब कार्यक्रमात बोलत असताना वॉटसनने आपलं मत मांडलं.

२०१९ विश्वचषकात रायुडूला भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी जागा मिळणं गरजेचं होतं. परंतू तत्कालीन निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने रायुडूला वगळून विजय शंकरला संधी दिली. यानंतर संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतरही निवड समितीने रायुडूचा विचार केला नाही. ज्यामुळे नाराज झालेल्या रायुडूने राजीनामा दिला.