तिसऱ्या एकदिवस सामन्यात तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी नजराजन यानं भारतीय संघात पदार्पण केलं आहे. कर्णधार विराट कोहलीनं सामना सुरु होण्यापूर्वी पदार्पणाची कॅप देत नटराजनचं भारतीय संघात स्वागत केलं आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. टी नटराजन भारताकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा २३२ वा खेळाडू ठरला आहे.

भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण करताना नटराजन तामिळनाडूचा पाचवा गोलंदाज आहे. याआधी १९८२ मध्ये टी.ए. शेखर यांनी १९८२ मध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केलं होतं. भारतीय संघात स्थान मिळालेला शेखर तामिळनाडूचा पहिला गोलंदाज होता. त्यानंतर बी. अरुण (१९८६), टी कुमारन (१९९९), बालाजी (२००२) आणि नटराजन (२०२०) यांनी भारतीय संघात पदार्पण केले आहे.


दुबईत पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात नटराजन यानं आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं होतं. हैदराबाद संघाकडून खेळताना नटराजन यानं आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. आयपीएलच्या १६ सामन्यात नटराजन यानं १६ बळी घेतलं आहेत. या हंगामात सर्वाधिक यॉर्कर नटराजनच्या नावावर आहेत. नटराजन यानं आयपीएलच्या १३ व्या हंगामात जवळापास ७० यॉर्कर टाकले होते.

दरम्यान, स्थानिक क्रिकेटमध्ये नटराजन यानं आपल्या कामगिरीनं प्रभावित केलं आहे. २० प्रथम श्रेणी सामन्यात ६४ विकेट घेतल्या आहेत.