नव्या वर्षांत नवे आव्हान भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला साद घालत आहे. विश्वविजेतेपद गमावल्यानंतर प्रथमच शास्त्रीय (क्लासिकल) प्रकारात सेव्हॉय येथे झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पध्रेत आनंदचा कस लागणार आहे. या स्पध्रेतील दिग्गज बुद्धिबळपटूंमध्ये आनंदचे क्रमवारीतील स्थान सर्वात खालचे आहे.
झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पध्रेत सहा खेळाडूंचा समावेश असून, त्यांच्यात पाच फेऱ्या रंगणार आहेत. आनंदला हरवून बुद्धिबळातील जगज्जेतेपद काबीज करणारा मॅग्नस कार्लसनसुद्धा त्यानंतर पहिलीच स्पर्धा खेळत आहे. विश्रांतीनंतर ताजातवाना झालेल्या आनंदसाठी हे नवे आव्हान असेल. या स्पध्रेतील कामगिरीनिशी तो पुन्हा भरारी घेऊ शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील अर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियन, इटलीचा फॅबियानो करूना, अमेरिकेचा हिकारू नाकामुरा आणि इस्रायलचा बोरिस गेल्फंड हे अव्वल बुद्धिबळपटू या स्पध्रेत सहभागी होत आहेत.
विश्वविजेतेपद गमावल्यानंतर आता आनंदची जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. आनंद प्रथमच एखाद्या स्पध्रेत सर्वात खालच्या स्थानानिशी उतरत आहे. जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या ताज्या क्रमवारीनुसार, नाकामुरा तिसऱ्या, करूना चौथ्या आणि गेल्फंड आठव्या स्थानावर आहे.
विश्वविजेतेपदाची लढत संपल्यानंतर लंडन क्लासिक स्पध्रेच्या निमित्ताने आनंद स्पर्धात्मक बुद्धिबळ स्पध्रेत परतला. परंतु ती स्पर्धा (झटपट) रॅपिड प्रकारातील होती. रशियाच्या व्लादिमिर क्रामनिककडून पराभूत झाल्यामुळे आनंदचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. मार्च महिन्यात होणाऱ्या कॅण्डिडेट्स स्पध्रेपूर्वी स्वत:ला आजमावण्याची आनंदला ही संधी असेल.