यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेने प्रस्थापित विजेत्यांची चौकट मोडून काढली. दिग्गजांच्या माघारीनंतर गेली अनेक वर्ष टेनिस वर्तुळात असणाऱ्या परंतु जेतेपदाचे स्वप्न अपुरे राहिलेल्या खेळाडूंनी यश मिळवले. त्यांच्या यशाने ग्रँडस्लॅमचे स्वप्न पाहणाऱ्या टेनिसपटूंना वेगळा आयाम मिळाला आहे. या यशाला भविष्यात सातत्याची जोड मिळाली तर टेनिसला नवे आणि हक्काचे विजेते मिळतील.
इंग्लंडचे स्वप्न साकार
खेळ-खेळाडू, कौशल्य, तंदुरुस्ती या सगळ्यापेक्षा भावना वरचढ झाल्याचं चित्र मरेच्या विजयाने सिद्ध झालं. आता प्रतीक्षा नको, जेतेपद हवंच अशा पद्धतीने इंग्लंडवासीयांनी मरेसाठी जेतेपद प्रतिष्ठेचं केले. २०११ विश्वचषकाच्या वेळी भारतीय क्रिकेट संघालाही २६ वर्षांनंतर इतिहास घडवायचा होता. दडपण झेलण्यासाठी अकरा वीर तयार होते, पण मरेच्या बाबतीत तसं नव्हतं,
तो एकटा होता. ७७ वर्षांच्या आशा-अपेक्षा त्याच्याशी एकवटल्या होत्या. मरेपेक्षा इंग्लंडवासियांनाच जेतेपदाची आस लागली होती. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यासह प्रत्येक क्षेत्रातली मान्यवर मंडळी अंतिम लढतीला आवर्जुन उपस्थित होती. अंतिम लढतीच्या तिकिटाचा दर ३१ लाखांपर्यंत गेला होता, विम्बल्डन परिसरात मरे आणि पर्यायाने इंग्लंड समर्थकांचा जनसागर पसरला होता. या सगळ्या माहौलने दुसरा कुणी गडबडून गेला असता, पण मरेचा निर्धार पक्का होता. उपविजेतेपद, उपांत्य फेरी या टप्प्यात तो अनेकदा अडकला आहे. पण यावेळी मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याने दडपणाखाली न येता सकारात्मक उपयोग करून घेतला. दर्जेदार खेळ हेच त्याने उद्दिष्ट होते आणि त्याप्रमाणे त्याने खेळ केला, म्हणूनच या जेतेपदाचे महत्त्व अनोखे आहे.
मरे-जोकोव्हिच नवे योद्धे
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी हाती घेतलेली ग्रँडस्लॅम जेतेपदांची मशाल आता अँडी मरे आणि नोव्हाक जोकोव्हिच या टेनिसपटूंकडे संक्रमित झाली आहे. फेडररने तिशी गाठली आहे, त्याच्या हालचालीत वय स्पष्ट जाणवू लागले आहे. त्यातच पाठीच्या दुखण्यानेही त्याला सतवले आहे. दुसरीकडे राफेल नदालने क्ले कोर्टवर वर्चस्व सिद्ध केले आहे मात्र अन्य कोर्ट्सवर तो झगडताना दिसत आहे. गुडघ्याच्या दुखापतीने त्याच्या कोर्टवरील हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून विम्बल्डनमधून फेडरर, नदालला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर मरे आणि जोकोव्हिच यांच्याकडेच संभाव्य विजेते म्हणून पाहिले गेले. दोघांनीही चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवत अंतिम फेरी गाठली. मरे आणि जोकोव्हिच २६ वर्षांचे आहेत. भविष्यात ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावण्यासाठी वय त्यांच्या हातात आहे.
बाटरेलीचं अनपेक्षित यश
मारिओन बाटरेलीच्या विजयाने अन्य महिला टेनिसपटूंना आगळा विश्वास मिळाला आहे. महिला टेनिससाठी बाटरेली नवीन नाही. वडील वॉल्टर बाटरेली यांच्याकडे बाटरेलीने टेनिसची धुळाक्षरं गिरवली. मात्र कारकीर्दीत महत्त्वाच्या टप्प्यावर तिने फ्रान्सची माजी खेळाडू अ‍ॅमेली मॉरेस्मोचं मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे विम्बल्डनच्या यशाने सिद्ध झाले आहे.
काही वेळा गुणवत्तेपेक्षा मनाची दृढता सरस ठरते याचा प्रत्यय बाटरेलीच्या विजयाने आला. अ‍ॅथलिट म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जी शरीररचना उभी राहते, त्या चित्रात बाटरेली बसत नाही. प्रत्येक फटका दोन्ही हाताने रॅकेट पकडून मारणारी, सामन्यादरम्यान स्वत:शी संवाद साधणारी, सरावासाठी म्हणून हवेत उंच उडय़ा मारणारी, एखाद्या खंद्या कार्यकर्त्यांला शोभावा असा डोक्याला हेअरबॅण्ड यापैकी काहीही विजेता या संकल्पेनशी साधम्र्य साधणारे नाही. पण तरीही बाटरेली जिंकली आहे. गुणी, मेहनती पण सर्वसाधारण खेळाडू म्हणून गणना होणाऱ्या बाटरेलीने विम्बल्डनची थाळी उंचावली तेव्हा भल्याभल्या टेनिस तज्ज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला. दुहेरीवर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी एकेरी खेळणाऱ्या सानिया मिर्झाने बाटरेलीला दोनदा नमवले आहे. बाटरेलीच्या यशाबरोबर दोन मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे- एक म्हणजे बाटरेली ग्रँडस्लॅम नावावर करू शकते तर आपणही ग्रँडस्लॅम पटकावू शकतो हे बळ अन्य टेनिसपटूंना मिळाले आहे. सेरेना जबरदस्त फॉर्ममध्ये असताना असे बळ मिळणे फारच महत्त्वाचे आहे. दुसरा मुद्दा म्हणजे बाटरेली या यशाचे सातत्य टिकवू शकते का? क्रमवारीत तिच्यापेक्षा खूप मागे असलेल्या खेळाडूकडून ती सहज पराभूत होते. विम्बल्डनमध्ये जेतेपदापर्यंतच्या सातही लढतीत तिने एकदाही अव्वल दहा मानांकित खेळाडूपैकी कोणाचाही सामना केला नाही. सेरेना, शारापोव्हा, अझारेन्का, रडवानस्का, लि ना यांसारख्या खेळाडूंचे आव्हान समोर असते तर बाटरेलीचे ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न, स्वप्नच राहण्याची शक्यता जास्त होती. हे यश परिश्रमाने मिळवलेले आहे हे सिद्ध करण्यासाठी बाटरेलीला सातत्याची जोड द्यावी लागेल.
ब्रायन बंधू सुसाट..
मरे आणि बाटरेलीच्या विजयात या जोडगोळीचं यश झाकोळलं गेलं. पुरुष दुहेरीच्या जेतेपदासह माइक आणि बॉब ब्रायन या जोडीने चारही ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक नावावर करण्याची किमया केली. ३५व्या वर्षीही या दोघांची अफाट ऊर्जा आणि विजयाची भूक थक्क करणारी आहे.
बोपण्णाचं यश
लिएण्डर पेस, महेश भूपती यांच्या छायेतून बाहेर पडत रोहन बोपण्णाने यंदाच्या विम्बल्डनमध्ये शानदार कामगिरी केली. दुहेरीत का होईना पण बोपण्णाच्या रूपाने भारताला सक्षम प्रतिनिधित्व मिळाले आहे.