गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय हॉकी संघ हा त्याच्या मैदानातील कामगिरीपेक्षा, प्रशिक्षकांच्या अदलाबदलीमुळे जास्त लक्षात राहिलेला आहे. क्रिकेटवेड्या भारतात हॉकीकडे लोकांचा असणारा कल आणि प्रसारमाध्यमांकडून मिळणारी प्रसिद्धी पाहता, भारतात हॉकी कितपत टिकेल असा प्रश्न गेली अनेक वर्ष क्रीडा समीक्षक विचारत आहेत. मात्र ज्या पद्धतीने हॉकी इंडियाचा कारभार सुरु आहे, तो पाहता मुख्य संघटनेलाच या देशात हॉकी जगवायची आहे की नाही असा प्रश्न पडतो. रोलांट ओल्टमन्स यांच्यानंतर जोर्द मरीन यांना पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार व्हावं लागणं म्हणजे, आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी या म्हणीचा प्रत्यय येतो.

गेल्या काही वर्षांत हॉकी इंडियामध्ये घडलेल्या घडामोडी या अतिशय रंजक स्वरुपाच्या आहेत. रोलंट ओल्टमन्स यांच्यानंतर प्रशिक्षकपदाची सुत्र स्विकारलेल्या जोर्द मरीन यांना नुकतचं हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदावरुन पायउतार व्हायला भाग पाडलं. या कारवाईचं कारण होतं, गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात एकही पदक पडलं नाही. त्याआधी मलेशियात झालेल्या सुलतान अझलन शहा हॉकी चषक स्पर्धेतही भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. या खराब कामगिरीमुळेच मरीन यांना पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार व्हावं लागलं. हॉकी इंडियाने मरीन यांच्याकडे भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे.

जोर्द मरीन यांना पद का सोडावं लागलं??

मात्र ओल्टमन्स यांची हकालपट्टी झाल्यानंतर मरीन यांनी संघाचा कार्यभार हाती घेऊन एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं. कोणत्याही प्रशिक्षकाला एखाद्या संघाशी जुळवून घेण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो, मात्र सुपरफास्ट निकालांची घाई झालेल्या हॉकी इंडियाने मरीन यांना स्थिर होण्याचा कालावधी न देता बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गेल्या २४ वर्षांमध्ये हॉकी इंडियाच्या गचाळ कारभाराला बळी पडलेले मरीन हे २४ वे प्रशिक्षक ठरले आहेत.

क्रिकेट असो किंवा हॉकी, कोणताही प्रशिक्षक आपल्या संघासाठी काही खास रणनिती आखत असतो. संघातील कच्चे दुवे ओळखून त्यांचा खेळ कसा सुधारता येईल यासाठी प्रत्येक प्रशिक्षक मार्गदर्शन करत असतो. ओल्टमन्स यांचे शिष्य म्हणून ओळख असलेल्या जोर्द मरीन यांनीही भारतीय हॉकी संघासाठी काही खास रणनिती आखल्या होत्या. यामध्ये संघात कामगिरी न करणाऱ्या सिनीअर खेळाडूंना विश्रांती देऊन तरुण खेळाडूंना संधी देणं, वन-टच पासमध्ये सुधारणा, पेनल्टी कॉर्नवरचं तंत्र विकसीत करणं यासारख्या अनेक गोष्टींवर मरीन यांनी भर दिला होता. याच धोरणाअंतर्गत सरदार सिंहला डावलून इतर तरुण खेळाडूंना संघात संधी देण्याची भूमिका मरीन यांनी घेतली होती. मात्र मरीन यांची ही Chop and Cut पॉलिसी अनेक खेळाडूंच्या पचनी पडली नव्हती. त्यातचं राष्ट्रकुल स्पर्धेतल्या खराब कामगिरीचं निमीत्त झालं आणि अवघ्या काही महिन्यांमध्येच मरीन यांना प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला.

हॉकी इंडियाला प्रशिक्षक बदलाचा रोग –

जोर्द मरीन यांची हकालपट्टी हे हॉकी इंडियाच्या गचाळ कारभाराचं काही पहिलं उदाहरण नाहीये. याआधी अनेक परदेशी प्रशिक्षकांना भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. यातील काहींना खराब कामगिरी तर काहींनी संघटनेशी वैर पत्करल्यामुळे त्यांची प्रशिक्षकपदाची कामगिरी बहरु शकली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये हॉकी इंडियाने मायकल नॉब्ज, रिक चार्ल्सवर्थ, टेडी वॉल्श, पॉल वॅन अस, रोलंट ओल्टमन्स आणि जोर्द मरीन या प्रशिक्षकांना कोणतं न कोणतं कारण देत बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र या सर्व प्रशिक्षकांच्या हकालपट्टीमागे एक धागा समान होता, तो म्हणजे मनासारखी कामगिरी झाली नाही, बदला प्रशिक्षक!!!

पी हळद, हो गोरी असं सुत्र कोणत्याही खेळात लागू होतं. एखाद्या संघासोबत आपली घडी बसवण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जावा लागतो. एखाद्या प्रशिक्षकाने राबवलेल्या सुत्रांची नीट अंमलबजावणी होण्यासाठी, खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये एक नातं निर्माण होण्यासाठी जास्तीत जास्त सराव सामने, युरोपियन देशांचे दौरे करणं गरजेचं असतं. मात्र दुर्दैवाने हॉकी इंडियाने कोणत्याही प्रशिक्षकाला भारतीय संघासोबत स्थिर होण्यासाठी पुरेसा वेळच दिला नाही, एका स्पर्धेतल्या अपयशाच्या जोरावर जर प्रशिक्षकांच्या कामगिरीचं मुल्यमापन होणार असेल तर तुमचा संघ प्रत्येक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा कशी करता येईल??

भारतीय हॉ़कीचं घोडं नेमकं कुठे पेंड खातंय??

मेजर ध्यानचंद यांच्या काळात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॉकीत दबदबा गाजवणारा देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र दुर्दैवाने भारत ध्यानचंद यांच्या सोनेरी आठवणींमध्ये अजुनही अडकून बसला आहे. कालानुरुप हॉकीमध्ये अनेक बदल झाले, मात्र दुर्दैवाने भारतीय हॉकी संघाने हॉकीतले हे बदल आत्मसात केलेच नाहीत. आजही युरोपियन देशांच्या तुलनेत भारतीय हॉकी संघाचा खेळ हा मागासलेलाच आहे. छोट्या – छोट्या गोष्टींमध्ये भारतीय हॉकी संघ आज मैदानावर मार खातोय, मात्र खेळाडूंच्या या चुका सुधारण्याऐवजी हॉकी इंडियाने यात एक सोपा उपाय शोधून काढला आहे तो म्हणजे, प्रशिक्षक बदलण्याचा!!

खेळ कोणताही असो, प्रशिक्षक हा संघाला मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. प्रत्यक्ष मैदानात, रणनिती लढवत खेळण्याचं काम हे खेळाडूंनाच करायचं असतं. त्यामुळे एखाद्या स्पर्धेत काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही, तर त्यांच्या चुकीची शिक्षा प्रशिक्षकांना देणं हे कितपत दुरापास्त आहे?? गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय हॉकी संघ कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर कुचकामी ठरतो आहे याची एकदा माहिती करुन घेऊया…

१) पेनल्टी कॉर्नवरचा कन्व्हर्जन रेट –

हॉकी सामन्यांमध्ये पेनल्टी कॉर्नर हो कोणत्याही संघासाठी गोल करण्याची सुवर्णसंधी म्हणून ओळखला जातो. प्रतिस्पर्धी संघाच्या पेनल्टी एरियात, जर एखाद्या खेळाडूच्या पायाला चेंडू लागला तर समोरच्या संघाला पेनल्टी कॉ़र्नर बहाल केला जातो. मात्र गेल्या काही स्पर्धांमध्ये या क्षेत्रात भारताची कामगिरी अतिशय चिंताजनक आहे.

रुपिंदरपाल सिंह आणि हरमनप्रीत सिंह हे सध्या भारतीय हॉकी संघात ड्रॅगफ्लिकर म्हणून खेळतात. प्रत्येक सामन्यात भारतीय संघाला किमान ८-९ पेनल्टी कॉर्नर मिळतात. मात्र यापैकी फक्त १-२ कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर होतं. अशा सोन्यासारख्या संधी जर भारतीय संघ गमावणार असेल तर कोणत्याही सामन्यात जिंकण्याचा अधिकारच भारतीय संघाकडे उरत नाही. ड्रॅगफ्लिकर्सच्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी हॉकी इंडियाने ऑस्ट्रेलियाचा माजी ड्रॅगफ्लिकर ख्रिस सिरीलोला मार्गदर्शन म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र सिरीलोने व्यक्त केलेल्या मतानुसार, भारतीय खेळाडूंमध्ये जिंकण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही. खेळ सुधारण्याआधी त्यांच्या मनात आपण सामना जिंकू शकतो हा आत्मविश्वास आणणं गरजेचं आहे. इतक्या सकारात्मक उर्जेचे प्रशिक्षक असतानाही भारतीय संघ मैदानात कुचकामी ठरत असेल तर दोष नेमका कोणाचा समजायचा??

२) कमकुवत बचावफळी –

मोक्याच्या क्षणी बचावफळीतल्या खेळाडूंचा खराब खेळ हा भारतीय हॉकी संघासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये बलाढ्य जर्मनीविरुद्धच्या सामन्यात भारताने आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या ४ सेकंदांमध्ये जर्मनीने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. यावेळी भारतीय संघाचा एकही बचावपटू गोलरक्षक पी. आर. श्रीजेशसोबत उभा नव्हता. याचा फायदा घेत जर्मनीने अखेरच्या सेकंदांमध्ये संधी साधत भारताला धक्का दिला. कित्येक सामन्यांनंतरही भारतीय संघाची ही जुनी खोड काही केल्या सुधारताना दिसत नाहीये.

३) शेवटच्या सेकंदांमध्ये कच खाणं –

अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघ आक्रमक सुरुवात करतो. मात्र अखेरच्या सत्रात, प्रतिस्पर्धी संघाने आक्रमण केल्यानंतर भारतीय खेळाडू हे गरज नसताना दबावाखाली जातात. अनेकदा या गोष्टीमुळे भारताने एकतर सामना गमावला आहे किंवा बरोबरीत समाधान मानलं आहे. कित्येक सामन्यांमध्ये शेवटच्या सेकंदांमध्ये प्रतिस्पर्धी संघ आक्रमण करत असताना, भारतीय खेळाडू शॉर्ट पास देऊन बॉलवरचा ताबा आपल्याकडे ठेवतात. अशा प्रसंगामध्ये बॉल स्कूप करुन दूर मारल्याने समोरच्या खेळाडूला बॉलवर घेता येत नाही. मात्र भारतीय संघाच्या गावी ही पद्धतच नाही का असा प्रश्न मला कित्येकदा पडतो.

मरीन यांना पायउतार व्हावं लागल्यानंतर हरेंद्र सिंह भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक झाले आहेत. आगामी काळात भारतीय संघ आशियाई खेळ, चॅम्पियन्स ट्रॉफी, विश्वचषक अशा महत्वाच्या स्पर्धांना सामोरं जाणार आहे. त्यामुळे कालावधी कमी आणि आव्हानं डोंगराएवढी अशी गत सध्या भारतीय संघाची झालेली आहे. त्यामुळे या स्पर्धांमध्ये भारतीय संघाकडून चांगली कामगिरी करुन घेण्याची मोठी जबाबदारी भारतीय संघाकडे असणार आहे. या कामगिरीत हरेंद्र सिंह यशस्वी झाले तर उत्तमच, मात्र असं न झाल्यास व्यवस्था हरेंद्र सिंह यांचा बळी घेतल्याशिवाय जाणार नाही. जोपर्यंत मुळ समस्या ओळखून तिचं निवारण करण्याकडे हॉकी इंडिया भर देणार नाही, तोपर्यंत असा प्रशिक्षक अदलाबदलीचा खेळ चालूच राहील. मात्र या सगळ्या गोष्टींमधून भारतीय हॉकी ही अजुळ गाळात रुतत जाईल यात काही शंका नाही.