लॉकडाउनपश्चात आपला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सिडनी वन-डे सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी मात केली. कर्णधार फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या शतकी खेळाच्या आधारावर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३७४ धावांचा डोंगर उभा केला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टिव्ह स्मिथला या सामन्यात आपला हरवलेला सूर सापडवा. ६६ चेंडूंचा सामना करत स्मिथने ११ चौकार आणि ४ षटकार लगावत १०५ धावांची खेळी केली.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही स्मिथने मैदानात येऊन तुफान फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांवर दडपण वाढवलं. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात स्मिथची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नव्हती. तरीही यावर मात करत स्मिथने दमदार पुनरागमन करत आपल्यातली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याच्या या खेळीने प्रभावित झालेल्या आकाश चोप्राने स्मिथला भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे. वाचा काय म्हणतोय आकाश चोप्रा…

स्मिथ आणि फिंच यांच्याव्यतिरीक्त डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. डेव्हिड वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी फिंचसोबत १५६ धावांची भागीदारी केली, तो ६९ धावांवर बाद झाला. यानंतर मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेलनेही १९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह फटकेबाजी करत ४५ धावांची खेळी केली आणि संघाला त्रिशतकी धावसंख्या ओलांडायला मदत केली.