जगभरासह भारतात करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करत परिस्थितीचा सामना करण्याची तयारी दाखवली आहे. सध्याच्या काळात केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अ‍ॅपबद्दल अनेक चर्चा झाल्या. देशभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची नेमकी माहिती, रेड-ग्रीन-ऑरेंज झोन कुठे आहेत, रुग्णांची संख्या, उपचार केंद्र याविषयीची सर्व माहिती या अ‍ॅपमध्ये आहे. अनेक ठिकाणी केंद्र सरकारने हे अ‍ॅप डाऊनलोड करणं अनिवार्य केलं आहे. हॉकी इंडियानेही आपल्या खेळाडूंसाठी हे अ‍ॅप अनिवार्य केलं आहे. आगामी स्पर्धांसाठी संघात जागा हवी असेल तर हॉकी इंडियाशी संलग्न असलेल्या प्रत्येक खेळाडूने आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आदेश संघटनेने दिले आहेत.

पुढील स्पर्धांमध्ये भाग घेण्याआधी प्रत्येक खेळाडूला आरोग्य सेतू अ‍ॅपच्या माध्यमातून स्वतःचं स्टेटस चेक करावं लागणार आहे. ‘सेफ’ किंवा ‘लो रिस्क’ या दोन गटातील खेळाडूंचा पुढील स्पर्धांसाठी विचार केला जाईल असं हॉकी इंडियाने स्पष्ट केलंय. समजा एखादा खेळाडू ‘मॉडरेट’ किंवा ‘हाय रिस्क’ असं येत असेल तर त्याने प्रवास करण्याची गरज नसल्याचंही हॉकी इंडियाने आपल्या नियमावलीमध्ये म्हटलंय. केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणं अनिवार्य केलं आहे. मात्र या अ‍ॅपच्या सुरक्षिततेवरुन मध्यंतरी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अ‍ॅपमधील डेटा हॅकर्सच्या हाती सहज लागेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती, मात्र केंद्राने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.