दुखापतीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचला आराम देण्यात आला आहे. फिंचच्या अनुपस्थित उपकर्णधार मॅथ्यू वेड याच्याकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत भारतीय संघानं १-०नं आघाडी घेतली आहे. कर्णधारच खेळणार नसल्यामुळे पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास खालावलेला असू शकतो. ऑस्ट्रेलियासाठी जमेजी बाजू म्हणजे भन्नाट फॉर्मात असलेल्या मार्कस स्टॉयनिसचं पुनरागमन झालं आहे.

(ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली, मिचेल स्टार्कनं टी-२० मालिकेतून घेतली माघार )

दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीनं नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, कर्णधार फिंच या सामन्यात खेळणार नाहीत. तर भारताकडून शामीला आराम देण्यात आला आहे.

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं अष्टपैलू डॅनिअल सॅम, अँड्रू टाय आणि स्टॉयनिसला संघात जागा दिली आहे. कर्णधार फिंचनं आपल्या दुखापतीबाबत कोचला कळवलं होतं. त्यानंतर एका सामन्यासाठी त्याला आराम देण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियानं घेतला. पुढील सामन्यात फिंच खेळण्याची शक्यता असल्याचं कोच जॅस्टिन लँगर यांनी सांगितलं.

भारतीय संघात श्रेयस अय्यर, शार्दुल आणि चहल यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. मनिष पांड्येच्या कोपऱ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला आराम देण्यात आला आहे. तसेच कसोटी सामन्याचा विचार करुन शामीलाही आराम देण्यात आला आहे. तर दुखापतग्रस्त जाडेजाच्या जागी चहलला संघात स्थान देण्यात आलं आहे.