|| प्रशांत केणी

त्याची फलंदाजी म्हणजे मुक्तछंदातलं काव्य. शून्य अंशापासून ते ३६० अंशांपर्यंतच्या परिघावर तो लीलया सत्ता गाजवतो. क्रिकेटच्या कोणत्याही शब्दकोशात किंवा प्रशिक्षण मार्गदर्शिकेत न सापडणारे फटके त्याच्या भात्यात आहेत. जगातील मातब्बर गोलंदाजांना धडकी भरवण्याचे सामथ्र्य असलेली त्याची अचाट फलंदाजी क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. म्हणूनच तो असामान्य आहे. कधी अफलातून झेल घेण्याचं त्याचं अमानवी कसब पाहून सुपरमॅन, स्पायडरमॅन अशा उपमा त्याला दिल्या जातात. ‘सचिन.. सचिन..’ नंतर विराटनामानंही मैदानं दुमदुमली नसतील, त्यापेक्षा अधिक प्रमाणात ‘एबीडी!.. एबीडी!..’ या जयघोषानं चाहत्यांच्या हृदयसिंहासनावर राज्य केलं. सचिन तेंडुलकरचे सर्व विश्वविक्रम एखादा भारतीय क्रिकेटपटूच मोडेल, असं भाकित भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं. त्यावेळी गावसकरचं म्हणणं खोटं ठरवण्याची क्षमता असलेला एकमेव क्रिकेटपटू पृथ्वीतलावर होता, तो म्हणजे अब्राहम बेंजामिन डी व्हिलियर्स. इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर डी व्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तडकाफडकी अलविदा केला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा वर्षभराच्या अंतरावर आली असताना त्यानं घेतलेला निवृत्तीचा निर्णय सर्वानाच आश्चर्यचकित करणारा आहे. विश्वचषकाच्या इतिहासात महत्त्वाच्या क्षणी अपयशी ठरणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ‘चोकर्स’ हा शिक्का बसला आहे. तोच पुसण्याचं स्वप्न डी व्हिलियर्सनं बाळगलं होतं. त्याच्या आत्मचरित्रातील ‘द ड्रीम’ हे प्रकरण नेमकं तेच सांगते. मग कारकीर्द ऐन बहरात असताना हा महानायक आपल्या स्वप्नापासून फारकत कशी काय घेऊ शकतो, हाच प्रश्न क्रिकेटजगताला पडला आहे.

आत्मचरित्राद्वारे स्पष्टीकरण

एबी प्रिटोरियाच्या आफ्रिकन्स हायस्कूलचा विद्यार्थी. परंतु विद्यार्थिदशेतच त्यानं आपल्यातील असामान्य प्रतिभेनं सर्वाचं लक्ष वेधून घेतल्याचं म्हटले जातं. शालेय वयात गोल्फ, टेनिस, हॉकी, रग्बी, फुटबॉल, स्क्वॉश, जलतरण, आदी खेळांमध्ये त्यानं राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारल्याच्या अफवा त्याच्याविषयी पसरवल्या जात होत्या. अगदी शास्त्रविषयक प्रकल्पाकरिता प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला पुरस्काराचा तो मानकरी ठरल्याचेही म्हटलं गेलं होतं. अखेरीस यात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगण्यासाठी त्यानं आपल्या आत्मचरित्रामध्ये ‘ऑल राऊंडर’ हे एक प्रकरणच लिहिलं आहे.

भारताशी ऋणानुबंध

जॉन्टी ऱ्होड्सनं भारतात जन्मलेल्या आपल्या मुलीचं नाव ‘इंडिया’ ठेवलं आहे. त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत एबी आपल्या तिसऱ्या मुलाचं नाव ताज ठेवणार आहे. या मागची कहाणीसुद्धा रोचक आहे.

प्रेमाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या ताज महालच्या साक्षीनं एबीनं आपला प्रेमप्रस्ताव डॅनियल स्वार्टपुढे ठेवला. ‘‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील?’’ या शब्दांत त्यांनं आपली हृदयस्पंदनं मांडली. तिला क्षणभर आकाशसुद्धा ठेंगणं वाटायला लागलं. आपल्या नजाकतमय खेळानं अखंड क्रिकेटजगतावर राज्य करणारा हा क्रिकेटमधील राजपुत्र आपलं मांडलिकत्व पत्करत आहे, याची जाणीव डॅनियलला नखशिखांत सुखावत होती. तिनंही वेळ न दवडता ‘होय’ म्हटलं. दोघांनीही या प्रेमस्वीकृतीला वाड्निश्चयाचा दर्जा दिला. एबीनं मग ताज महालसोबतच्या दोघांच्या छायाचित्रासह ‘ट्विटर’वर जाहीर केलं की, ‘‘माझ्या स्वप्नांच्या राणीशी मी साखरपुडा करतो आहे. हा एक अद्वितीय अनुभव आहे!’’

२०१२मध्ये आयपीएलचा पाचवा हंगाम सुरू होण्याआधी डी’व्हिलियर्सनं आपल्या प्रेयसीसोबत घेतलेली आग्राभेट अशा प्रकारे चर्चेचा विषय ठरली. डॅनियल केपटाऊनची. सहा वर्षांपूर्वी या दोघांची एका पार्टीमध्ये एकमेकांशी भेट झाली. दोघांचे कुटुंबीयसुद्धा एकमेकांशी चांगले परिचित होते. त्यामुळे या प्रेमाच्या गाडीला वाटेत कुठेच अडथळा नव्हता. परंतु एबीची कारकीर्द बहरत असल्यामुळे प्रसारमाध्यमांपासून त्यांनी हे प्रेमप्रकरण बराच काळ गुप्तच ठेवलं. पण अखेर ताज महालच्या साक्षीनं त्यांनी तेसुद्धा जगजाहीर केलं. मग वर्षभरातच त्यांचं लग्न झालं. भारताशी ऋणानुबंधाचं नातं जपणाऱ्या डी व्हिलियर्सनं आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या माध्यमातून येथील मैदानंसुद्धा गाजवली आहेत. हेच नातं जपून त्यानं निवृत्तीच्या निर्णयासाठीसुद्धा भारताचीच निवड केल्याचं अधोरेखित होतं. त्याच्या इंग्रजी आत्मचरित्रातील ‘इन्स्पायरड बाय इंडिया’ हे प्रकरण संपल्यानंतर अखेरीस ‘क्रिकेट खेलने के लिए सबसे अच्छी जगह भारत है’ ही हिंदीतील ओळ सहजपणे लक्ष वेधते.

टेनिसऐवजी क्रिकेटला प्राधान्य

सहाव्या वर्षी टेनिसमध्ये एबीची कामगिरी बहरू लागली. त्याचा पहिलाच सामना रंगला तो इझाक व्हान डर मर्वेशी. जो कालांतरानं दक्षिण आफ्रिकेचा अव्वल व्यावसायिक टेनिसपटू झाला. आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा प्रतिस्पध्र्याविरुद्धही त्यानं आरामात विजय मिळवले. तासन्तास तो ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे सामने पाहायचा. विम्बल्डन विजेतेपद आणि जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान मिळवण्याचं स्वप्न एबीनं जोपासलं होतं. मात्र टेनिस की क्रिकेट किंवा रग्बी असा आव्हानात्मक प्रश्न समोर उभा राहिला. मग सांघिक खेळ जीवनात महत्त्वाचा ठरेल, या भूमिकेतून त्यानं टेनिसला काट मारून क्रिकेटची निवड केली.

  • टोपणनाव : एबी, एबीडी, मिस्टर ३६०, सुपरमॅन, स्पायडरमॅन, प्रिन्स ऑफ प्रिटोरिया.
  • १७ : एबीचा जन्म १७ फेब्रुवारी १९८४ला झाला. त्यामुळे या क्रमांकावर त्याची मर्जी बसली आणि तोच पुढे त्याने जर्सी क्रमांक ठेवला.
  • खेळण्याची शैली : मैदानावर ३६० अंशात कुठेही फटकेबाजी करण्यात वाकबदार. नावीन्यपूर्ण फटके खेळण्याचे कौशल्य अवगत. अगदी वेगवान गोलंदाजांनाही स्वीप करण्याची क्षमता.
  • अष्टपैलुत्व : मध्यमगती गोलंदाज म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५ धावांत २ बळी. पॉइंटच्या मोक्याच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यात पटाईत. याचप्रमाणे यष्टीरक्षण करण्याचीही क्षमता.
  • आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडूचा वार्षिक पुरस्कार : एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने हा पुरस्कार २०१०, २०१४ आणि २०१५ असा तीनदा जिंकला.
  • वेगवान : एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान ५० धावा (१६ चेंडूंत), १०० धावा (३० चेंडूंत) आणि १५० धावा (६४ चेंडूंत) करण्याचे तिन्ही विश्वविक्रम नावावर.
  • सर्वाधिक कसोटी सामन्यांनंतर भोपळा : सर्वाधिक सामन्यांनंतर शून्यावर बाद होण्याचा विक्रम डी’व्हिलियर्सने नोंदवला आहे. ७८ सामन्यांनंतर २००८मध्ये बांगलादेशविरुद्ध तो शून्यावर बाद झाला होता.