दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू एबी डीव्हिलियर्स याची नुकतीच करोना चाचणी करण्यात आली. शनिवारी टी3 सॉलिडॅरीटी कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. निधी जमवण्यासाठी हा सामना खेळण्यात येणार असून यास Solidarity Cup असे नाव देण्यात आले आहे. या सामन्यातून जमा झालेला निधी करोना व्हायरसमुळे अडचणीत सापडलेल्यांना मदत म्हणून दिला जाणार आहे. ही स्पर्धा शनिवारी, १८ जुलैला (नेल्सन मंडेला जागतिक दिवस) खेळण्यात येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून डीव्हिलियर्ससह ५० जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या.

करोना चाचणी करण्यात आलेल्या ५० जणांमध्ये खेळाडू, प्रशिक्षक आणि इतर सहाय्यक कर्मचारी वर्ग यांचा समावेश होता. या स्पर्धेत आठ-आठ खेळाडूंचे तीन संघ एकाच सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. एबी डीव्हिलियर्स, कगीसो रबाडा आणि क्विंटन डी कॉक हे तीन संघाचे कर्णधार असणार आहेत. त्यांच्यासह फाफ डु प्लेसिस, एडन मार्क्रम यांसारखे बडे खेळाडूही खेळणार आहेत. त्यामुळे या साऱ्यांची करोना चाचणी घेण्यात आली. सुदैवाने या चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये कोणाचाही करोना अहवाल पॉझिटीव्ह आला नाही अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली. १० ते १३ जुलैदरम्यान या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

तीन संघ एकच सामन्यात आमने-सामने

दक्षिण आफ्रिकेत नव्या ढंगात क्रिकेट पुनरागमन करणार आहे. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर शनिवारी तीन संघांमध्ये एक सामना खेळला जाणार आहे. (वाचा आगळेवेगळे नियम) करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची भीती लक्षात घेता हा सामना सध्या तरी खेळवण्यात येऊ नये असे द. आफ्रिका सरकारकडून सांगण्यात आले होते. असा सामना भरवण्यासाठी आणि प्रेक्षकांना त्यात समाविष्ट करण्यासाठी अजून तयारीची गरज आहे असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे आवश्यक ती तयारी करून अखेर हा सामना खेळवण्याची परवानगी मिळवण्यात आली आहे.