बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखल झाले. आपापल्या संघासोबत क्वारंटाइन कालावधी संपवून आता हळूहळू संघ मैदानात उतरताना दिसत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघदेखील नुकताच नेट्समध्ये सरावासाठी हजर झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या एबी डीव्हिलियर्सच्या फलंदाजीची खूप दिवसांनी साऱ्यांना झलक पाहायला मिळाली. त्याने आपल्या साथीदारांसह सराव सत्रात फटकेबाजीचा आनंद लुटला. डीव्हिलियर्स २२ ऑगस्टला डेल स्टेन आणि ख्रिस मॉरिस यांच्यासोबत युएईमध्ये दाखल झाला. तो सहा दिवस क्वारंटाईन होता. त्याची कोविड-19 तपासाणी झाली. त्यात त्याचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील त्याच्या साथीदारांसह प्री-सीझन शिबिरासाठी मैदानात फटकेबाजी करताना दिसला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये खेळाडू मैदानावर सराव करत आहेत. डीव्हिलियर्सदेखील दीर्घ काळानंतर फलंदाजीसाठी नेट्समध्ये उतरला. डीव्हिलियर्सला दुसऱ्या सराव सत्रात संधी मिळाली. पहिल्या नेट सत्रात कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन, फिरकीपटू युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम हे खेळले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अद्याप IPL करंडक जिंकलेला नाही. यावेळी त्यांना ते शक्य होतं का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.