सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाहीये. मात्र असं असलं तरीही विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचं चांगलचं कौतुक केलं आहे. विराट हा आताच्या घडीचा सर्वोत्तम खेळाडू असल्याचं एबी डिव्हीलियर्सने नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं. यानंतर विराट कोहलीनेही आफ्रिका दौऱ्यात आपल्या बहरलेल्या फलंदाजीचं श्रेय डिव्हीलियर्सला दिलं आहे.

अवश्य वाचा – IPL 2018: ‘विराट आणि एबीडी म्हणजे क्रिकेटमधील फेडरर आणि नदाल’

आफ्रिका दौऱ्यात पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला दोन्ही डावात मिळून केवळ ३३ धावा करता आल्या होत्या. मात्र यानंतर दुसऱ्या कसोटीत विराटने १५३ धावांची शतकी खेळी करुन अखेरच्या कसोटीतही अर्धशतकी खेळी करुन परदेशी खेळपट्टीवर आपली उपयुक्तता सिद्ध केली. यानंतर वन-डे मालिकेतही विराटने ३ शतकं आणि १ अर्धशतक लगावलं. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराटने आफ्रिका दौऱ्यावर असताना डिव्हीलियर्सचा खेळ पाहून मी माझ्या खेळात सुधारणा केल्याचं म्हणलं आहे.

“आफ्रिका दौऱ्यात डिव्हीलियर्सचा खेळ पाहून मी माझी फलंदाजीची शैली बदलली. फटका खेळताना तुमच्या बॅटची पोजिशन कशी असावी, कोणता चेंडू सोडून द्यावा अशा अनेक गोष्टी मी डिव्हीलियर्सच्या खेळातून शिकलो. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये माझे फटके चुकत होते, मात्र डिव्हीलियर्सच्या फटक्यांचं फुटेज पाहून मी नंतर माझ्या खेळात सुधारणा केली”, ही गोष्ट आपण अजुनही डिव्हीलियर्सला सांगितली नसल्याचंही विराट म्हणाला.

अवश्य वाचा – जगातल्या ‘या’ सर्वोत्तम क्रिकेटपटूने केले विराटचे कौतुक

सध्याच्या घडीला एका विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खात्यात २ गुण जमा झाले आहेत. पुढील सामन्यात विराटच्या बंगळुरु टीमचा सामना दिल्ली डेअरडेविल्सशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात विराट-एबी डिव्हीलियर्स ही जोडी चमकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – भरपूर धावा होऊनही विराट कोहली असमाधानीच