करोना विषाणूच्या विळख्यात सापडलेलं क्रिकेट आता हळुहळु पूर्वपदावर येत आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत बहुचर्चित 3 TC Solidarity Cup सामन्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं. ३ संघ आणि एक सामना अशी ही संकल्पना होती. क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या प्रयोगात एबी डिव्हीलियर्सच्या इगल्स संघाने बाजी मारत सुवर्णपदक जिंकलं. महत्वाची गोष्ट म्हणजे डिव्हीलियर्सने या सामन्यात फटकेबाजी करत अर्धशतक झळकावत आपला फॉर्म सिद्ध केला. त्याला एडन मार्क्रमनेही चांगली साथ दिली.

एका सामन्यात ३ संघ सहभागी होत असल्यामुळे या सामन्याचे नियमही जरा हटके होते. नाणेफेकीऐवजी तिन्ही कर्णधारांसमोर बॉक्स ठेवण्यात आले होते. या बॉक्समध्ये १ ते ३ क्रमांक लिहिलेले चेंडू होते. १ क्रमांकाचा चेंडू ज्याला मिळेत त्याला पहिली फलंदाजी. डिव्हीलियर्सला यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू मिळाला. इतर दोन कर्णधारांपैकी टेंबा बावुमाच्या किंगफिशर संघाने पहिले फलंदाजी तर रेझा हेंड्रीग्जच्या काईट्स संघाने पहिले गोलंदाजी स्वीकारली.

किंगफिशर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ५६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इगल्स संघाने एडन मार्क्रमच्या फटकेबाजीच्या जोरावर पहिल्या सहा षटकात १ बाद ६६ तर काईट्स संघाने १ बाद ५८ धावा केल्या. दुसऱ्यांदा फलंदाजीला आलेल्या एबी डिव्हीलियर्सच्या इगल्स संघाने १२ षटकांत ४ बाद १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल काईट्स संघ ३ बाद १३८ तर किंगफिशर संघ ५ बाद ११३ धावांपर्यंत मजल मारु शकला. त्यामुळे इगलच्या संघाला सुवर्णपदक बहाल करण्यात आलं. डिव्हीलियर्सनेही या सामन्यात २४ चेंडूत ६४ धावा करत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं.