शॉन अॅबॉटने टाकलेला उसळता चेंडू लागून काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज फिलिप ह्युजेसचा मृत्यू झाला होता. अनेकांच्या काळजाला चटका लावून जाणाऱ्या या घटनेमुळे गोलंदाज शॉन अॅबॉटलाही मोठा धक्का बसला होता. मात्र, शुक्रवारी क्वीन्सलँडविरुद्धच्या सामन्यात १४ धावांत सहा बळी घेत अॅबोटने क्रिकेटच्या मैदानावर दमदार पुनरागमन केले. त्याच्या सात ओव्हरच्या स्पेलमध्ये वेग आणि रिव्हर्स स्विंगचे उत्तम मिश्रण दिसून आले. अॅबोटला यावेळी हॅटट्रिकची संधीही चालून आली होती. मात्र, ती थोडक्यात हुकली. त्याच्या या कामगिरीमुळे न्यू साऊथ वेल्सने क्वीन्सलँडचा अवघ्या ९९ धावांत खुर्दा उडवला. या उत्तम प्रदर्शनानंतर सर्व प्रेक्षकांनी सामना संपल्यानंतर अॅबोटला उभे राहून मानवंदना दिली.
गेल्या महिन्यात, ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शील्ड सामन्यात अॅबोटने टाकलेल्या चेंडू डोक्याला लागून गंभीर दुखापत झाल्यामुळे ह्युजेसचा मृत्यू झाला होता. संपूर्ण जगभरात गाजलेल्या या घटनेचा अॅबोटला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि फिलिपची बहीण अॅबोटला मानसिक आधार देण्यासाठी पुढे सरसावले होते. अॅबोट या धक्क्यातून सावरून मैदानात कधी परतणार याकडे, सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.