पाकिस्तानचा माजी अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाकने पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान संघ लवकरच क्रिकेटच्या सर्व प्रारूपांमध्ये प्रथम किंवा दुसर्‍या क्रमांकावर असेल. पाकिस्तानने तिन्ही फॉर्मेटमध्ये त्यांचा खेळ सुधारला असून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत सुधारणा झाली आहे, असे रझ्झाकने सांगितले.

पाकिस्तानची टीम चांगली फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. अब्दुल रझ्झाकच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या काही संघ संक्रमणाच्या अवस्थेत आहेत आणि लवकरच पाकिस्तान संघ जागतिक क्रिकेटमधील पावरहाऊस म्हणून उदयास येईल.

काय म्हणाला रझ्झाक?

रझ्झाक म्हणाला, ”दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंड यांसारख्या संघांकडे पाहावे लागेल, जे आत्ता आपल्यासारखे संघ बनवत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ कसा कमकुवत झाला, हे आपण पाहिले आहे परंतु पाकिस्तान त्या स्थितीत नाही. आमची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत सुधारणा झाली आहे.”

”माझ्या मते, आयसीसी क्रमवारीत जर तुम्हाला प्रथम किंवा द्वितीय स्थान गाठायचे असेल, तर तुम्हाला तिन्ही विभागात चांगली कामगिरी करावी लागेल. २० वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते. मला आशा आहे, की ज्या प्रकारे गोष्टी चालू आहेत त्यामुळे तिन्ही फॉर्मेटमध्ये पाकिस्तानचा संघ प्रथम किंवा द्वितीय स्थान गाठेल”, असेही रझ्झाकने सांगितले.

जर सध्याच्या पाकिस्तान संघाच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर ते वनडेमधील सहाव्या, टी-२० मधील चौथ्या आणि कसोटीत पाचव्या स्थानी आहेत.