जलतरणात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता असलेले नैपुण्य महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आहे. त्या नैपुण्याचा शोध घेऊन त्याचा विकास करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत, असे k10महाराष्ट्र जलतरण संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभय दाढे यांनी सांगितले.
दाढे हे माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलो व जलतरणपटू आहेत. अलीकडेच त्यांची पुणे जिल्हा जलतरण संघटना व महाराष्ट्र जलतरण संघटना या दोन्ही संघटनांचे अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच भारतीय जलतरण महासंघावर त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या डेक्कन जिमखाना क्लब व शिक्षण प्रसारक मंडळी आदी संस्थांवरही ते कार्यरत आहेत. जलतरणात महाराष्ट्राचे खेळाडू सतत चमक दाखवीत असतात तरीही जागतिक स्तरावर हे खेळाडू अपेक्षेइतके यश मिळवीत नाहीत, याबाबत दाढे यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीबरोबर गप्पागोष्टी केल्या.

राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी निवड अपेक्षित होती काय?
राज्य संघटना बरखास्त केल्यानंतर अस्थायी समितीचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. त्यामुळे संघटनेच्या नवीन कार्यकारिणीत मला स्थान देतील ही खात्री होती. तथापि या खेळातील माझा अनुभव पाहून अनेकांनी अध्यक्षपदासाठी माझ्या नावाचा आग्रह धरला. या खेळाने मला जो नावलौकिक दिला आहे, त्या ऋणांचे परतफेड करण्यासाठीच मी अध्यक्षपद स्वीकारले. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच खेळाच्या विकासावर भर देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

महाराष्ट्र सतत अन्य राज्यांना जलतरणपटू निर्यात करीत असतात असे म्हटले जाते. ही निर्यात थांबविण्यासाठी कोणते प्रयत्न केले जाणार आहेत?
 रेल्वे व सेनादल यांच्याकडून आपले अनेक खेळाडू खेळत आहेत. एअर इंडिया, पेट्रोलियम कंपन्या, सेन्ट्रल एक्साइज व राष्ट्रीयीकृत बँका यांच्याशी संपर्क साधून गुणवान खेळाडूंना नोक ऱ्या मिळवून देण्यासाठी आम्ही या आस्थापनांबरोबर चर्चा सुरू केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंना भरघोस रकमेची शिष्यवृत्ती देण्याची योजना लवकरच अमलात आणणार आहोत.

महाराष्ट्राचे अनेक कनिष्ठ खेळाडू कर्नाटकमध्ये प्रशिक्षणासाठी जातात व हळूहळू त्याच राज्यांमधून राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतात. हे टाळण्यासाठी काय उपाय केले जाणार आहेत?
 बंगळुरू येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र आहे, त्या धर्तीवर पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आम्ही राज्य शासनाकडे दिला आहे. अव्वल दर्जाचे प्रशिक्षक, फिजिओ, अद्ययावत व्यायामशाळा व उत्तम निवास व्यवस्था आदी सर्व सुविधा तेथे उपलब्ध केल्या जाणार आहेत. जर राज्य शासनास शक्य नसेल, तर आम्ही संघटनेतर्फेच हे केंद्र सुरू करणार आहोत. त्यासाठी ग्लेनमार्क यांच्यासह काही कंपन्यांबरोबर चर्चाही केली आहे. राज्य अजिंक्यपद स्पर्धामध्ये पहिले तीन क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना परदेशातील प्रशिक्षणाची किंवा परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्याची योजना आम्ही लवकरच अमलात आणणार आहोत.

डायव्हिंगमधील खेळाडूंच्या विकासाकरिता काय प्रयत्न केले जाणार आहेत?
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले अनेक खेळाडू डायव्हिंगमध्ये चांगली कामगिरी करीत आहेत. त्यांची कामगिरी अधिक चांगली व्हावी यासाठी मयूर व्यास, भाऊसाहेब दिघे, मिती आगाशे, स्मिता देवगीकर यांच्यासारख्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंची आम्ही मदत घेत आहोत. त्याचप्रमाणे सोलापूर, पुणे, मुंबई, नागपूर आदी मुख्य शहरांमध्ये नैपुण्य शोध व विकास केंद्र सुरू केली जात आहेत. तसेच परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अल्पकालीन शिबिरे आयोजित करण्याची योजना आहे.

वॉटरपोलोत महाराष्ट्राची पीछेहाट झाली आहे काय?
 हो. निश्चितच. गेल्या चारपाच वर्षांमध्ये स्पर्धाची संख्या कमी झाली आहे. या खेळाकडे आकर्षण वाढविण्यासाठी वायएमसीए, महात्मा गांधी क्लब, पी एम हिंदूबाथ, डेक्कन जिमखाना आदी क्लबतर्फे राज्य स्तरावर अधिकाधिक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. स्पर्धात्मक जलतरणातून दूर राहणारे खेळाडू वॉटरपोलोत आणण्यावर आमचा भर राहणार आहे. रोख पारितोषिकांच्या लीग स्पर्धाही आयोजित करण्याचा मानस आहे.

एक दिवसीय स्पर्धामुळे अनेक वेळा खेळाडूंची दमछाक होते काय?
 होय. अशा स्पर्धाऐवजी तीन दिवसांच्या स्पर्धा ठेवण्याची सूचना आम्ही करीत आहोत. एक दिवसाच्या स्पर्धेत एका खेळाडूने किती गटात व शर्यतींमध्ये भाग घ्यावा याबाबत आम्ही मार्गदर्शक तत्त्वेही आखणार आहोत.

मिशन ऑलिम्पिकसाठी राष्ट्रीय संघटनेद्वारे काय प्रयत्न केले जात आहेत?
वीरधवल खाडे, संदीप शेजवळ यांच्यासारखे सात-आठ खेळाडूंची निवड करून २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी आम्ही ठोस योजना आखली आहे. १३ ते १९ वर्षे वयोगटातील गुणवान खेळाडूंची निवड करीत त्यांना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे.