ग्रँडमास्टर आणि माजी विश्व कनिष्ठ विजेता अभिजित गुप्ताने रिकिव्हक आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पध्रेचे जेतेपद पटकावले. याच स्पध्रेत भारताच्या तानिया सचदेवने ग्रँडमास्टरचे निकष पूर्ण केले. दहाव्या आणि अखेरच्या फेरीत अभिजितने इटलीचा ग्रँडमास्टर फ्रान्सिस्को रॅमबॅल्दीला बरोबरीत रोखून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
आंतरराष्ट्रीय मास्टर तानियाने सातत्यपूर्ण खेळ करताना ग्रँडमास्टर किताबाचा दुसरा निकष पूर्ण केला. तानियाने अटीतटीच्या सामन्यात अलेक्झँडर बेलीआवस्कीला बरोबरीत रोखले. अभिजितने दहा डावांत सात विजय आणि तीन सामने अनिर्णीत राखून एकूण ८.५ गुणांची आघाडी घेतली. तानियाने उल्लेखनीय कामगिरी करत ७ गुणांसह चौदावे स्थान पटकावले. तसेच तिला स्पध्रेतील सवरेत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. रशियाचा दिमित्री अँड्रेकीनला आठ गुणांसह दुसऱ्या, तर ग्रँडमास्टर इव्हान चेपॅरीनोव्हला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

मोव्हसेसीयनविरुद्धच्या विजयामुळे मनोबल चांगलेच उंचावले होते. अव्वल दहा खेळाडूंमध्ये एकेकाळी स्थान पटकावणाऱ्या मोव्हसेसीयनचा खेळाचा दर्जा उच्च होता. सामना बरोबरीत सोडवण्याचा प्रस्ताव त्याने फेटाळल्यानंतर माझ्यातील जिंकण्याची जिद्द अधिक तीव्र झाली आणि त्याचा फायदा मला मिळाला.
– अभिजित गुप्ता