भारताचा माजी राष्ट्रीय विजेता अभिजित कुंटेने नी हुआवर सनसनाटी मात करत आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेला झकास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या सौम्या स्वामिनाथन व स्वाती घाटे यांनीही विजयी सलामी नोंदवली.  
कुंटेने कॅटलॉन ओपनिंगचा उपयोग करीत हुआविरुद्ध अव्वल दर्जाचा खेळ केला. त्याने केलेल्या वेगवान खेळामुळे हुआला बचावात्मक खेळ करणे भाग पडले. कुंटेने वजिराच्या बाजूकडील प्यादी विकसित करीत हुआवर दडपण आणले. अखेर हुआने ४१ व्या चालीला शरणागती स्वीकारली.
पुण्याच्या सौम्याने बांगलादेशच्या नझराना खान हिच्यावर सहज विजय मिळविला. तिचीच सहकारी स्वाती हिने कझाकिस्तानच्या एस.निजोद हिला हरविले. पुण्याच्याच ईशा करवडे हिने आर्यलडच्या दोर्सा देराखांनशी हिला बरोबरीत रोखले. भारताच्या तानिया सचदेव हिने चीनच्या गुओ तियानलु हिच्यावर  विजय मिळविला.
पुरुष गटात तिसऱ्या मानांकित कृष्णन शशिकिरण याने विजयी प्रारंभ करताना जेहोंगीर वाखिदोव याच्यावर मात केली तर राष्ट्रीय विजेत्या अभिजित गुप्ताने मंगोलियाच्या मुंखगाल गोम्बोसुरीन याला हरविले. सूर्यशेखर गांगुली याने इराणच्या अमिरेझा पौरामेझानिल याचा पराभव करीत विजयी प्रारंभ केला.