भारताचे ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू अभिजीत कुंटे, विदित गुजराथी आणि ललित बाबू यांच्यावर रविवारी फिलिपाइन्समध्ये गुंडांनी हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केला. या जीवघेण्या हल्ल्यातून तिघेही बचावले असून, यासंदर्भात ‘फिडे’ आणि आशियाई बुद्धिबळ महासंघाकडे तक्रार केली आहे. विदितने त्याच्या ‘फेसबुक’ खात्यामार्फत या हल्ल्यासंबंधी माहिती दिली आहे.

आशियाई अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी विदित फिलिपाइन्समधील मकाती शहरात असून तो आणि त्याचे सहकारी टियारा ओरिएंटल हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. रविवारी सायंकाळी विदित व अभिजीत हॉटेलबाहेरील परिसरात पाणी आणण्याकरिता गेले असता त्यांच्यावर काही हल्लेखोरांनी तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील मौल्यवान गोष्टींची मागणीदेखील केली. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी तेथून आपली सुटका करून घेतली.

‘‘ही कोणत्या प्रकारची स्पर्धा आहे, हे मला अद्याप समजलेले नाही. खेळाडूंना योग्य सुविधा तर पुरवल्या जात नाहीतच, त्याशिवाय त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही कोणी घेण्यास तयार नाही,’’ असे विदित संतापाने म्हणाला. या निमित्ताने परदेशातील स्पर्धासाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर  आला आहे.