भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता खेळाडू अभिनव बिंद्राची आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) अ‍ॅथलीट समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हा बहुमान मिळवणारा बिंद्रा हा पहिला भारतीय ठरला आहे. ‘‘हा माझ्यासाठी फार मोठा बहुमान आहे. या पदामुळे फक्त माझाच नाही तर आपल्या भारताचाही गौरव करण्यात आला आहे. या बहुमानाबरोबर ही फार मोठी जबाबदारी असून त्याची मला जाणीव आहे. खेळाच्या भल्यासाठी, सुधारणेसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन,’’ असे बिंद्राने सांगितले.