भारताचा एकमेक वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता शूटर अभिनव बिंद्राने कुंभमेळ्याच्या आयोजनावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. करोना व्हायरस धर्मांमध्ये कोणताही भेदभाव करत नसल्याचं सांगत अभिनव बिंद्राने करोना संकटात कुंभमेळ्याच्या आयोजनावरुन नाराजी जाहीर केली आहे. कुस्तीपटू योगेश्वर दत्तने कुंभमेळ्याचं समर्थन करणारं ट्विट केल्यानंतर अभिनव बिंद्राने त्याला फटकारलं आहे. हरिद्रारमधील कुंभमेळ्यात झालेल्या लाखोंच्या गर्दीमुळे देशात पुन्हा एकदा करोनाचा कहर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने कुंभमेळ्याचं समर्थन करताना अप्रत्यक्षपणे निजामुद्दीने मकरजसोबत तुलना केली होती. योगेश्वर दत्तने ट्विट करत म्हटलं होतं की, “कुंभमेळ्यात कोणीही बेकायदेशीरपणे प्रवेश करत नाही. लोक प्रोटोकॉलचं पालन करत आहेत. कोणीही तेथील सुरक्षारक्षक किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर थुंकत नाही. कोणीही प्रशासनापासून लपून पळत नाही. त्यामुळे कुंभमधील शांतीप्रिय भक्तांची बदनामी थांबवा”.

यावर अभिनव बिंद्राने मुळात कुंभमेळ्याचं आयोजन व्हायला हवं होतं का अशी विचारणा योगेश्वर दत्तला केली आहे. “मुळात देशात करोना संकट असताना कुंभमेळ्याचं आयोजन करण्याची गरज होती का? व्हायसर धर्मांमध्ये भेदभाव करत नाही,” असं अभिनव बिंद्राने म्हटलं आहे.

अभिनव बिंद्रा इतक्यावरच थांबला नाही. सत्ताधारी भाजपाचा सदस्या असणाऱ्या योगेश्वर दत्तला त्याने तू संपूर्ण क्रिडा क्षेत्राला यामुळे मान खाली घालायला लावत असल्याचं म्हटलं आहे. सध्याच्या घडीला जीव वाचवणे, करोनावर उपाय शोधणे, करोनामुळे जीव गमावणाऱ्यांसाठी करुणा आणि सहानुभूती दर्शवणं गरजेचं असल्याचं त्याने म्हटलं आहे.

कुंभमेळ्यात प्रतीकात्मक सहभागी होण्याचे मोदी यांचे आवाहन
करोना संकटामुळे हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील सहभाग प्रतीकात्मक ठेवण्यात यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलं. “आता दोन शाही स्नान पार पडले आहेत. त्यामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक पद्धतीने सहभाग घेऊन साजरा करावा, असं आवाहन आपण केलं आहे. असं केल्यामुळे करोना विरोधातील लढ्यास मोठी शक्ती मिळेल,” असे मोदी यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

‘‘आपण जुन्या आखाड्याचे स्वामी अवधेशानंद गिरी यांना दूरध्वनी केला होता. त्या वेळी ज्या संत, महंतांना करोनाचा संसर्ग झाला आहे त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. स्थानिक प्रशासनाला सहकार्य करीत असल्याबद्दल त्यांचे आभारही मानले’’, असेही पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

कुंभमेळ्यात येऊ नका : स्वामी अवधेशानंद
मोदी यांच्या दूरध्वनीनंतर अवधेशानंद यांनी लोकांना मोठ्या संख्येने कुंभमेळ्यात स्नानासाठी न येण्याचे आवाहन केलं आहे. स्वत:चे आणि इतरांचे प्राण वाचवणे ही पवित्र गोष्ट आहे असेही अवधेशानंद यांनी म्हटलें आहे.