ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्राने अखेर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकाचा दुष्काळ संपवत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक कांस्यपदकाची कमाई केली. यापुढे हौशी नेमबाज म्हणून खेळण्याचे बिंद्राने ठरवले असल्यामुळे ही कदाचीत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरची महत्त्वाची स्पर्धा असू शकेल. परंतु रिओ ऑलिम्पिक स्पर्धेकरिता पात्र होण्यासाठी आपण आशावादी असल्याचे बिंद्राने स्पष्ट केले आहे.
भारताचा अव्वल नेमबाज असलेल्या बिंद्राने संजीव राजपूत आणि रवी कुमार यांच्या साथीने भारताला सांघिक कांस्यपदकही मिळवून दिले. अंतिम फेरीसाठी पात्र होताना त्याने पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. मग आठ जणांच्या अंतिम फेरीत शांतपणे वेध घेत त्याने १८व्या प्रयत्नात १८७.१ गुण मिळवत कांस्यपदक पक्के केले.
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या बिंद्राने वैयक्तिक प्रकारात सहाव्या ते १२व्या प्रयत्नांपर्यंत ९.९ ते ९.६ या गुणांच्या दरम्यान वेध घेतला होता. अखेरच्या दोन प्रयत्नांत अनुक्रमे १०.६ आणि १०.७ गुण मिळवत बिंद्राने कांस्यपदक प्राप्त केले. बिंद्राचे आशियाई स्पर्धेतील हे पहिले वैयक्तिक पदक ठरले. जेतेपदासाठी दावेदार समजला जाणारा चीनचा १८ वर्षांचा युवा नेमबाज यँग हाओरान याने २०९.६ गुणांसह सुवर्ण तर त्याचा सहकारी आणि गतविजेत्या काओ यिफेई याने २०८.९ गुणांसह रौप्यपदक पटकावले.
महिलांच्या ट्रॅप प्रकारात श्रेयसी सिंग (६६ गुण), सीमा तोमर (६३ गुण) आणि शगुन चौधरी (५९ गुण) यांनी एकूण १८८ गुणांची कमाई करत सांघिक आठवे स्थान प्राप्त केले. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात हरप्रीत सिंग पात्रता फेरीत २९० गुणांसह सातव्या स्थानी फेकला गेला. गुरप्रीत सिंग आणि पेम्बा तमांग यांनीही निराशा केली.