देशातील रोकडरहित व्यवहारांचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी सरकारने ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचे सहकार्य घेण्याचे ठरवले आहे. सरकारने सुरू केलेल्या आय पे डिजीटल या मोहिमेसाठी नीती आयोगाने ऑलिम्पिक पदक विजेत्यांना प्रचारासाठी पाचारण केले आहे. सर्वात आधी नीती आयोगाने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राला या मोहिमेसाठी निमंत्रित केले, त्यानंतर योगेश्वर दत्त, दीपा मलिक यांना देखील या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच क्रिकेटपटू गौतम गंभीर देखील विज्ञान भवन येथे झालेल्या डिजीधन मेळाव्यास उपस्थित होता.

लोकांमध्ये डिजीटल व्यवहारांबद्दल जनजागृती व्हावी याकरिता हे सर्व खेळाडू प्रयत्न करणार आहेत. तसेच, दिल्ली, पटियाला, बंगळुरू, लखनौ आणि कोलकाता येथील साई केंद्रातील खेळाडूंना देखील आपल्या ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आय पे डिजीटलची जाहिरात करा असे सांगण्यात आले आहे. जर खेळाडूंनी रोकडविरहीत व्यवहारांचे महत्त्व सांगितले तर हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास सहकार्य होईल असे नीती आयोगाचे मुख्याधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले. जेव्हापासून अभिनव बिंद्रा या प्रचारात उतरला आहे तेव्हापासून ऑनलाइन व्यवहारात ४०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांनी म्हटले.

इ वॉलेट, ऑनलाइन बॅंकिंग आणि आधार अॅप पेमेंट यांच्या प्रचारासाठी आम्हाला लोकप्रिय चेहरे हवे होते. आपल्या देशातील खेळाडू हे लोकप्रिय तर आहेच परंतु त्यांची जनमानसांवर पकडही आहे हाच विचार करुन आम्ही खेळाडूंची निवड केली असे कांत यांनी इंडियन एक्सप्रेसला म्हटले. त्यामुळेच आम्ही या खेळाडूंना त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन डिजीटल पेमेंट्सचा प्रचार करावा अशी विनंती केली. खेळाडूंनी त्यांचे डिजीटल पेमेंटचे अनुभव शेअर करावेत, तसेच डिजीटल पेमेंटचे वेगवेगळे मार्ग काय आहेत याबद्दल त्यांनी आपल्या अकाउंटवरुन माहिती सांगावी असे या प्रचार मोहिमेत अपेक्षित असल्याचे कांत म्हणाले.