भारतीय महिला कबड्डी संघ पुरुष संघाप्रमाणेच दिमाखदार कामगिरी करत आहे. पुरुष कबड्डीपटूंना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळाले तसेच महिला कबड्डीपटूंनाही मिळावे यासाठी त्यांच्यासाठी प्रो-कबड्डी लीग सुरू व्हावी, असे मत बॉलीवूड अभिनेता आणि जयपूर पिंक पँथर्स संघाचा मालक अभिषेक बच्चनने सांगितले. महिलांच्या प्रो-कबड्डीसाठी पदाधिकाऱ्यांच्या मागे लागलो आहे. ही लीग प्रत्यक्षात साकारण्यासाठी माझ्यापरीने जे प्रयत्न करता येतील ते करेन. मात्र व्यावसायिक गणिते लक्षात घेणे आवश्यक आहे, भावनेच्या भरात घाई करून चालणार नाही, असे त्याने पुढे सांगितले.
‘‘लीग स्पर्धेतील संघमालक म्हणजे फायदा, तोटय़ाची गणितं, गुंतवणूक, प्रायोजक या गोष्टी समोर येतात. त्या स्वाभाविक आहेत.कष्टाने मिळवलेला पैसा मी प्रो-कबड्डी आणि इंडियन सुपर लीगमध्ये गुंतवला आहे. मात्र खेळाडूंना कुटुंबीय मानतो. संघाशी निगडित प्रत्येक लहानसहान गोष्टीची पूर्तता करणे हे माझे कर्तव्य आहे. कदाचित म्हणूनच दोन्ही संघांनी जेतेपदावर कब्जा केला आहे,’’ असे अभिषेकने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘कबड्डीपटूंची मैदानाबाहेर मैत्री घट्ट असते. हीच गोष्ट सगळ्यात जास्त भावते. प्रो-कबड्डी स्पर्धेने कबड्डीपटूंना पैसा मिळवून दिला आहे. मात्र त्याने ते हुरळून गेलेले नाहीत. खेळभावना जोपासण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्यासारखी आहे.’’