अभिषेक बच्चन, जयपूर पिंक पँथर्सचा मालक

प्रशांत केणी

प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम यंदा करोनाच्या साथीमुळे रद्द केल्यामुळे खेळाडूंचे सर्वाधिक आर्थिक नुकसान होणार आहे. पण पुढील हंगामाचे आयोजन उत्तम रीतीने होईल आणि लीगच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम होणार नाही, असा विश्वास जयपूर पिंक पँथर्सचा संघमालक अभिषेक बच्चनने व्यक्त केला.

अ‍ॅमेझॉन प्राइमवर ‘सन्स ऑफ द सॉइल : जयपूर पिंक पँथर्स’ या वेब सीरिजला ४ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. या निमित्ताने चित्रपट अभिनेता अभिषेक यांच्याशी केलेली खास बातचीत-

* यंदा करोनाच्या साथीमुळे प्रो कबड्डीचा हंगाम होत नाही. याकडे तू कसे पाहतोस?

प्रो कबड्डी गेली सहा वर्षे माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे यंदा प्रो कबड्डी नसल्याची खंत तीव्रपणे वाटते आहे. परंतु सध्या आपण सर्व करोना साथीच्या आव्हानाचा सामना करीत आहोत. खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संयोजन समिती, पदाधिकारी, आदी सर्वाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदाचा हंगाम न खेळवणेच योग्य ठरेल, असा निर्णय प्रो कबड्डी व्यवस्थापनाने घेतला. आम्ही सर्वच संघव्यवस्थापक या निर्णयाचा आदर करतो.

* टाळेबंदीच्या काळाकडे जयपूरचा संघ कशा रीतीने पाहत आहे?

जयपूरचे प्रतिनिधित्व करणारे सर्वच खेळाडू व्यावसायिक आहेत. या कालखंडात हे खेळाडू आपल्या शहरात किंवा गावात होते. तंदुरुस्तीच्या दृष्टिकोनातून त्यांनी जबाबदारीने स्वत:कडे लक्ष दिले आहे. आता हळूहळू काही भागांत मैदानावरील सरावालाही प्रारंभ झाला आहे. यातही ते हिरिरीने सहभागी होत आहेत.

* करोना साथीनंतर प्रो कबड्डीच्या अर्थकारणावर कसा परिणाम होईल?

प्रो कबड्डीचे आतापर्यंत सात हंगाम झाले आहेत. खेळाडूंना त्यांची गुणवत्ता आणि कामगिरीनुसार लिलावाद्वारे ठरलेल्या बोलीची रक्कम मिळायची. पण यंदा हंगामच नसल्याने हे पैसे त्यांना मिळणार नाहीत. याचप्रमाणे लीगमधील अन्य बक्षिसांनाही ते मुकणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना त्याची सर्वाधिक झळ पोहोचली, याची आम्हाला जाणीव आहे. परंतु प्रो कबड्डीतील संघांचे प्रतिनिधित्व करणारे बहुतांशी खेळाडू हे नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या करतात. त्यामुळे त्यांच्या रोजगारावर मोठा परिणाम झालेला नाही.

* ‘सन्स ऑफ द सॉइल’ या वेब सीरिजबाबत तुझी किती भावनिक जवळीक आहे?

२०१४ मध्ये सुरू झालेल्या प्रो कबड्डीत संघ खरेदी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वानाच आश्चर्य वाटले. परंतु माझा निर्धार पक्का होता. त्यावेळी माझी थट्टा करणारे आज कौतुक करीत आहेत. जयपूरचा संघ ही माझी जशी आर्थिक गुंतवणूक आहे, तशीच भावनिक गुंतवणूकही आहे. सांघिकपणे एका आक्रमकाला जेरबंद करण्याचा कबड्डी हा खेळच खास आहे. त्यामुळे  जयपूरचा संघ हा एका कुटुंबाप्रमाणेच आहे. हेच संघातील प्रत्येकावर बिंबवले आहे.

* जयपूरच्या आतापर्यंतच्या प्रवासाकडे एक संघमालक म्हणून तू कसे पाहतोस?

प्रो कबड्डीतील जयपूरच्या संघाला फक्त सहा-सात वर्षेच झाली असल्याने हा प्रवास मी अधुरा मानतो. प्रो कबड्डीची आणि जयपूर संघाची लोकप्रियता अशीच वाढत जावी, याकरिता मी सदैव प्रयत्नशील राहतो. भविष्यात प्रो कबड्डीचा कधीही विषय येईल, तेव्हा जयपूरचे नाव अभिमानाने घेतले जावे, हीच माझी इच्छा आहे.

* प्रो कबड्डी सुरू झाल्यापासून गेल्या काही वर्षांत चित्रपट आणि मालिकांमध्ये कबड्डी हा खेळही दिसू लागला आहे. या बदलाकडे तुम्ही कसे पाहता?

लोकसंस्कृतीचे चित्रपट, मालिका, नाटके आणि लेखनात नेहमीच प्रतिबिंब उमटत असते. प्रो कबड्डी येण्यापूर्वीपर्यंत फक्त क्रिकेटचे वातावरण देशभरात होते. आता कबड्डीनेही समाजात ते स्थान मिळवल्यामुळे या माध्यमांत हा खेळ दिसणे स्वाभाविक आहे. देशातील लोकांना कबड्डी अधिक आवडू लागली आहे, हे सकारात्मक चिन्ह आहे.