टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या प्रणती नायकला मोठय़ा स्पर्धामध्ये दडपणाखाली कशा प्रकारे खेळ उंचवावा, याचे कौशल्य अवगत आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून नक्कीच पदकाची अपेक्षा केली जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया भारताची आघाडीची जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरने व्यक्त केली.

पायाच्या दुखापतीमुळे गेल्या जवळपास दोन वर्षांपासून जिम्नॅस्टिक्सपासून दूर असलेल्या दीपाची सलग दुसऱ्या ऑलिम्पिकला पात्र ठरण्याची संधी हुकली, परंतु दीपाने लवकरच झोकात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.

‘‘मी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू न शकल्याचे दु:ख आहेच. मात्र जिम्नॅस्टिक्स प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारी किमान एक खेळाडू असल्यामुळे मी समाधानी आहे. प्रणतीला मी २०१० पासून ओळखते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये ती ज्या मानसिक तयारीने उतरते, ते खरंच कौतुकास्पद आहे. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात ती पटाईत आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्येही तिने पदक जिंकण्याची कमाल केल्यास मला आश्चर्य वाटणार नाही,’’ असे दीपा म्हणाली. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रोडूनोव्हा व्हॉल्ट प्रकारात दीपाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. तिच्यानंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी प्रणती ही दुसरी भारतीय जिम्नॅस्टिक्सपटू ठरली आहे.