धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडत असतो. विराट कोहली कायमच आपली उत्कृष्ट खेळी करतो. धावांचा पाठलाग करत असताना विराट कोहली स्वत: वर कधीही तणाव आणि दडपण घेत नाही. तणावातही विराट आपला नैसर्गिक खेळ करत असतो म्हणूनच इतर फलंदाजापेक्षा सरस आणि स्पेशल असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या स्तंभात व्यक्त केले आहे.

एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी करणारे अनेक फलंदाज आहेत. पण कोहली त्यांच्यापेक्षा वेगळा ठरतो. कारण, पहिल्या डावात फलंदाजी करताना सगळेच चांगली खेळी करतात. पण मोठ्या धावसंखेचा पाठलाग करताना तणावाला सामोरं जावे लागते. एका बाजूने विकेट जात असतील तर संयम ठेवून फलंदाजी करावी लागते. लागोपाठ विकेट गेल्यानंतर काही षटके निर्धाव जातात, त्यानंतर फलंदाजावर तणाव (प्रेशर) वाढतो. अशावेळी अनेक फलंदाज अडखळतात आणि आपल्या विकेट फेकतात. विराट कोहली याला अपवाद आहे. तो संयमाने फलंदाजी करतो. दबावात त्याची फलंदाजी आणखी खुलते. धावांचा पाठलाग करताना विराट कोहली सहजरित्या मोठी धावसंख्या गाठतो. यामुळेच तो इतर फलंदाजापेक्षा सरस ठरतो अशा शब्दात सुनील गावसकर यांनी विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिज संघाच्या मधल्या फळीवर कौतुकांचा वर्षाव केला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शाई होप आणि कर्णधार जेसन होल्डर यांनी कठीण परिस्थितीत वेस्ट इंडिजला सावरले. अखेरच्या काही षटकांत अॅशले नर्सने तुफानी फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर भारत फलंदाजी करताना कर्णधार होल्डरने गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना झटपट बाद करत वेस्ट इंडिजने सामन्यावर पकड मजबूत केली होती. पण विराट कोहली फलंदाजी करत होता, तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने होता. पण कर्णधार होल्डरने गोलंदाजीत बदल करत अनुभवी सॅम्युअल्सकडे चेंडू सोपवला. सॅम्युअल्सने अनुभवाच्या जोरावर विराट कोहलीला बाद केले. विराट बाद झाल्यानंतर सामना वेस्ट इंडिजने जिंकल्यात जमा होता, असे गावसकर म्हणाले.

भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला दुबळं समजू नये असा सल्लाही गावसकर यांनी दिला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर चौथा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत दोन्ही संघाने प्रत्येकी १-१ विजय मिळवला आहे, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी हा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. आत्मविश्वास उंचावलेल्या वेस्ट इंडिजशी भिडताना संघातील योग्य समतोल साधण्याचे प्रमुख आव्हान भारतापुढे असेल.