भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरामध्ये इंग्लंडच्या जेम्स अँडरसनच्या सहाशे कसोटी बळींच्या विक्रमाला मागे टाकण्याची क्षमता आहे, अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू कोर्टनी वॉल्श यांनी व्यक्त केली.

अँडरसन नुकताच कसोटी कारकीर्दीत सहाशे बळी मिळवणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. ‘‘वयाच्या ३८व्या वर्षीही अँडरसनची तंदुरुस्ती उत्तम आहे. पुढील दोन वर्षांत तो सातशे बळींच्या आसपासही मजल मारू शकतो,’’ असे वॉल्श म्हणाले.

‘‘सध्याच्या ३० वर्षांखालील गोलंदाजांपैकी भारताच्या बुमरामध्ये अँडरसनचा कित्ता गिरवण्याची क्षमता आहे. बुमराची गती आणि गोलंदाजीची शैली फलंदाजांना अडचणीत टाकते. त्यामुळे त्याने फक्त तंदुरुस्तीवर मेहनत घेतली तर तोसुद्धा कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करू शकेल,’’ असेही वॉल्श यांनी सांगितले.