‘आयपीएल’च्या सुरुवातीला प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती

वृत्तसंस्था, मुंबई

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या आठवडय़ाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मुकणार आहेत. कारण ‘आयपीएल’च्या १३व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असल्याचे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी घोषित केले असले तरी ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा मात्र १६ सप्टेंबपर्यंत चालणार आहे.

‘आयपीएल’चे वेळापत्रक हे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंसाठी प्रतिकूल असल्याने पहिल्या आठवडय़ात संघांना त्यांच्याशिवायच हंगामाला प्रारंभ करावा लागणार आहे. ओर्ल्ड ट्रॅफर्ड येथे १६ सप्टेंबरला इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधील ‘आयपीएल’चे खेळाडू त्याच दिवशी किंवा १७ तारखेला लंडनहून दुबईला प्रयाण करतील. संयुक्त अरब अमिरातीत पोहोचल्यावर क्रिकेटपटूंना करोना चाचणीला सामोरे जावे लागेल. याशिवाय प्रमाणित कार्यपद्धतीनुसार विलगीकरण, आदी नियमांचे पालन करावे लागेल.

‘‘लवकरच खेळाडू, मार्गदर्शक आणि संघांचे किंवा संघटनेचे अन्य व्यक्ती यांच्यासाठी ‘बीसीसीआय’ आणि ‘आयपीएल’ प्रमाणित कार्यपद्धती जारी करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना चाचणी आणि कार्यपद्धतीचे पालन केल्याशिवाय संघांचे प्रतिनिधित्व करता येणार नाही,’’ असे ‘आयपीएल’च्या सूत्रांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाचा संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार होता. मात्र करोनाच्या साथीमुळे तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांचा दौरा सप्टेंबपर्यंत लांबणीवर पडला आहे. या दौऱ्यावरील पहिला ट्वेन्टी-२० सामना एजेस बाऊल येथे ४ सप्टेंबरला होणार आहे. ही मालिका झाल्यास इंग्लंड आपला संपूर्ण उन्हाळी हंगाम वाचवू शकेल. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला प्रक्षेपणकर्त्यांकडून ३३ कोटी ६० लाख डॉलर्स मिळणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचे १७ आणि इंग्लंडचे ११ असे या दोन देशांचे एकूण २८ क्रिकेटपटू ‘आयपीएल’साठी करारबद्ध करण्यात आले आहेत. यात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर हे क्रिकेटपटू खात्रीपूर्वक इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका खेळणार असल्याने ते पहिल्या आठवडय़ाला मुकणार आहेत. यंदाच्या हंगामाद्वारे ऑस्ट्रेलियाच्या १७ क्रिकेटपटूंना एकूण ८६.७ कोटी रुपये तर इंग्लंडच्या ११ क्रिकेटपटूंना एकूण ४३.८ कोटी रुपये मानधन मिळणार आहे.

* संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झाल्यावर तेथील सरकारी नियमानुसार क्रिकेटपटूंची कोविड १९ चाचणी घेण्यात येईल. जर करोना चाचणी नकारात्मक आली, तरच त्यांना अलगीकरण कक्षातून बाहेर पडण्याची परवानगी मिळू शकेल. या संपूर्ण प्रक्रियेला ४८ ते ७२ तास लागतील.

* आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन करावे लागेल. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना आपल्या ‘आयपीएल’ संघाकडून खेळण्यासाठी सात ते १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘आयपीएल’साठी आफ्रिके च्या १० खेळाडूंना ‘ना हरकत प्रमाणपत्र’

नवी दिल्ली : यावर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिके च्या १० खेळाडूंना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात आले आहे. एबी डीव्हिलियर्स, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन, क्विं टन डीकॉक, फॅ फ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहिर, लुंगी एन्गिडी, कॅ गिसो रबाडा, हार्डस विलोजेन आणि डेव्हिड मिलर यांना हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिके ट मंडळाचे प्रसिद्धीमाध्यम व्यवस्थापक कोके त्सू गाओफे टोगे यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘‘आयपीएलमध्ये खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिके च्या खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाईल. १० खेळाडूंना आम्ही ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे.’’

तीन ठिकाणी ‘आयपीएल’वर नजर ठेवणे सोपे – अजिंत सिंग

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) तीन ठिकाणी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यांवर नजर ठेवणे सोपे जाणार आहे, असे मत भारतीय क्रिके ट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अध्यक्ष अजित सिंग यांनी व्यक्त के ले. १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान दुबई, शारजा आणि अबू धाबी या तीन ठिकाणी ‘आयपीएल’चे १३वे पर्व रंगणार आहे. ‘‘अमिरातीमध्ये तीन मैदानांवरच ‘आयपीएल’चे सामने रंगणार आहेत. त्यामुळे या सामन्यांवर नजर ठेवणे आम्हाला सोपे जाणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक तयार झाल्यानंतर आम्ही मनुष्यबळाची आखणी करणार आहोत. सध्या ‘बीसीसीआय’च्या सेवेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आठ अधिकारी आहेत,’’ असे अजित सिंग यांनी सांगितले.