सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले आणि दहशतवाद यामुळे भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाक क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयविरोधात आयसीसीच्या लवादाकडेही दाद मागून झाली, मात्र या विरोधात त्यांना कोणतंही यश मिळालं नाही. दोन देशांमधील मालिका रद्द झाल्यामुळे बीसीसीआयला याचा फारसा आर्थिक फटका बसलेला नसला तरीही पाक क्रिकेट बोर्डाचं यात मोठं नुकसान झालेलं आहे. २००८ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही मालिका होत नाहीयेत. ज्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाचं अंदाजे ९० लाख अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झालेलं आहे.

बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्डामध्ये ५ वर्षांचा करार झाला होता. जो करार एप्रिल महिन्यात संपणार आहे. या करारानुसार भारत आणि पाकिस्तान घरच्या मैदानावर दोन मालिका खेळणार होते. या मालिकेसाठी पाक क्रिकेट बोर्डाने मोठी तयारी केली होती, ज्यासाठी कोट्यवधी डॉलर्सचे करारही करण्यात आले होते. मात्र बीसीसीआयने यातून माघार घेतल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसल्याची माहिती, पाक क्रिकेट बोर्डातील विश्वसनीय सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.

पाकिस्तान आणि भारत या संघात दोन मालिका खेळवलं जाणं अपेक्षित होतं. यासाठी Ten Sports आणि PTV या दोन वाहिन्यांशी करार करण्यात आले होते. मात्र ही मालिका रद्द झाल्यामुळे दोन्ही वाहिन्यांनी अंदाजे ९० लाख डॉलर्सची रक्कम कापून घेतली आहे. याव्यतिरीक्त अन्य देशांमधील मालिकांच्या वेळापत्रकात अदलाबदल झाल्यामुळेही पाक क्रिकेट बोर्डाला आर्थिक फटका बसल्याची माहिती सुत्रांनी दिली. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया चषकाचं यजमानपदही पाकिस्तानकडे देण्यात आलेलं आहे. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द आहेत. त्यामुळे आशिया चषकाचं भवितव्यही सध्या अंधारातचं आहे.