ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक लँगर यांचा इशारा

मेलबर्न : पितृत्वाच्या रजेमुळे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन कसोटी सामन्यांना मुकणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या भूमिकेचा आदर करायलाच हवा. परंतु प्रतिष्ठा पणाला असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत कोहलीची अनुपस्थिती भारतासाठी धोकादायक ठरू शकेल, असा सावधगिरीचा इशारा ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिला आहे.

अ‍ॅडलेडची पहिली कसोटी संपल्यानंतर म्हणजे २१ डिसेंबरनंतर कोहली मायदेशी परतणार आहे. कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म जानेवारीच्या पूर्वार्धात अपेक्षित असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्याला पितृत्वाची रजा मंजूर करण्यात आली आहे.

‘‘माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून कदाचित मी विराट कोहलीचेच नाव घेईल. याची अनेक कारणे आहेत. कोहलीची फक्त फलंदाजीच नव्हे, तर ऊर्जा, खेळाविषयीची उत्कट भावना आणि मैदानावरील वावर हेसुद्धा भारावणारे आहे. त्यामुळेच क्रिकेटपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या त्याच्या निर्णयाचाही मी आदर करतो,’’ असे लँगर यांनी सांगितले. ‘‘अपत्याच्या जन्मासंदर्भात कोणत्याही खेळाडूने माझ्याकडे सल्ला मागितल्यास मी हा क्षण कधीच चुकवू नकोस, असे मी सांगेन. कारण हे आपले व्यक्ती म्हणून महत्त्वाचे कर्तव्य असते,’’ असे लँगर यावेळी म्हणाले.