विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करत असणाऱ्या राहणेनं बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. रहाणेच्या शतकी खेळीच्या बळावर भारतानं पहिल्या डावात ३२६ धावा उभारल्या. २२३ चेंडूत १२ चौकारांसह रहाणेन ११२ धावांची खेळी केली. रहाणेच्या या खेळीचं अनेक आजी-माजी खेळाडूंनी कौतुक केलं आहे. भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहलीनं राहणेचं कौतुक केलं. विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतला आहे.

मायदेशी असणाऱ्या विराटनं भारतीय संघाचं आणि रहाणेचं कौतुक करताना ट्विट केलं आहे. विराट कोहलीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘ आपल्यासाठी आणखी एक चांगला दिवस. कसोटी क्रिकेट आपल्या सर्वोच्च स्थानी पोहचलं. रहाणेची सर्वोत्तम खेळी.’ विराट कोहली मायदेशात असला तरी त्याचं सर्व लक्ष ऑस्ट्रेलियात होत असलेल्या कसोटी मालिकेवर आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीनं ट्विट करत भारतीय संघाचं मनोबल वाढवलं होतं.

दरम्यान सोशल मीडियावर अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाची चर्चा सुरु आहे. काहींनी विराट कोहलीला ट्रोलही केलं आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अंजिक्य रहाणे भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. आतापर्यंत अजिंक्य रहाणेनं कर्णधाराला साजेशी खेळी केली आहे. तसेच रहाणेच्या नेतृत्वावर अनेक दिग्गज प्रभावित झाले आहेत.