आशिया चषक स्पर्धेची सध्या दुबई आणि अबूधाबीत धामधूम सुरु आहे. भारत आणि बांगलादेश या दोन संघांमध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना २८ तारखेला रंगणार आहे. आशिया चषक स्पर्धा ही दुबई आणि युएई येथे आयोजित करण्यात आल्यामुळे क्रिकेटच्या प्रसाराला मदत झाल्याचे आयसीसीने म्हंटले होते. त्या बरोबरच आंतरराष्ट्रीय सामने आणि खेळाडू यांचा खेळ पाहायला मिळणार, त्यामुळे प्रेक्षकांनीही सामन्यांना गर्दी केली. याच दुवा साधत अबुधाबी मध्ये सर्वात छोटी अशी टी२० स्पर्धा खेळवली जाणार आहे.

अबुधाबीमध्ये या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ही टी२० लीग झटपट स्वरूपाची म्हणजेच कमी वेळेत खेळवण्यात येणार आहे. ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान ही लीग खेळली जाणार आहे.

या स्पर्धेत सहा संघांचा सहभाग असणार आहे. या लीगमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि संयुक्त अरब अमिरातीमधील खेळाडू सहभागी होणार आहेत. या लीगमधील पहिला सामना ऑकलंड एसेस आणि बुस्ट डिफेडर्स या संघात रंगणार आहे. तसेच, या लीगमध्ये ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी, शेन वॉटसन, सुनील नरिन, रशिद खान, अॅल्बी मॉर्केल, डॅरेन सॅमी, लसिथ मलिंगा या सारख्या मोठ्या खेळाडूंच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.