बॅडमिंटन लढतीचा निकाल आणि वातानुकूलित यंत्रणा यांचा एकमेकांशी संबंध असेल असे सकृतदर्शनी वाटत नाही. मात्र बंदिस्त स्टेडियम्समध्ये उपस्थितांना गारेगार ठेवण्यासाठी कार्यान्वित ही यंत्रणा सामन्याच्या निकालावरच प्रभाव टाकताना दिसत आहे. ज्या दिशेला वातानुकूल यंत्रणा असते, त्या समोर असणाऱ्या खेळाडूंना मागून आणि बाजूने शीतल हवेचा झोत अंगावर येतो. बॅडमिंटनसारख्या दमवणाऱ्या खेळात अशा प्रकारचा गारवा चांगला असतो. मात्र त्याच वेळी वातानुकूलित यंत्रणेतून बाहेर पडणाऱ्या हवेच्या झोतामुळे खेळाडूने परतावलेला फटका प्रतिस्पर्धी खेळाडूच्या कोर्टाबाहेर जाण्याची शक्यता वाढते.
गेम संपल्यानंतर खेळाडू बाजू बदलतात. कोर्टच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वातानुकूलित यंत्रणा उपयोगाची ठरत नाही. दुसऱ्या बाजूला शीतल हवेचा झोत तेवढय़ा तीव्रतेने पोहोचत नसल्याने खेळाडूची दमछाक वाढते. परंतु वातानुकूलित यंत्रणा मागे नसल्याने परतीचा फटका अचूक जाण्याची शक्यता वाढते.
यामुळे वातानुकूलित यंत्रणा द्वयर्थक ठरली आहे. भव्य प्रेक्षागृहात वातानुकूलित यंत्रणेशिवाय वावरणे कठीण आहे. परंतु या यंत्रणेमुळे हवामानात होणारे बदल टाळून डावपेच आखण्याचे आव्हान खेळाडू आणि प्रशिक्षकांसमोर आहे. बॅडमिंटनमध्ये वापरण्यात येणारे शटल खूपच हलके असते. मोठय़ा प्रेक्षागृहासाठी वातानुकूलित यंत्रणा मोठय़ा स्वरूपाची असते. त्यातून बाहेर पडणाऱ्या हवेच्या झोतामुळे शटल भरकटण्याची शक्यताच जास्त असते.
नुकत्याच गुआंगझाओ येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत लिन डॅन आणि ली चोंग वेई यांच्यात झालेली लढत वातानुकूलित यंत्रणेतील गोंधळामुळे वादग्रस्त ठरली होती. मुंबईत सोमवारी झालेल्या लढतीत विजयी हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या सायनाने याबाबत आपली भूमिका मांडली. वातानुकूलित यंत्रणेच्या स्थितीनुसार कोर्टची एक बाजू तुमच्यासाठी विरोधी ठरते. ‘‘वातानुकूलित यंत्रणेमुळे शटलचा वेग आणि दिशेवर परिणाम होतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र मोठय़ा प्रेक्षागृहात वातानुकूलित यंत्रणेशिवाय वावरणे खेळाडू आणि प्रेक्षकांनाही कठीण होऊ शकते. तूर्तास तरी खेळाडूंना या यंत्रणेमुळे होणारा परिणाम सहन करतच खेळावे लागेल,’’ असे इंडियन बॅडमिंटन लीगच्या प्रशासकीय समितीचे उपाध्यक्ष आणि भारतीय बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांनी सांगितले.