शौचास जाणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा भरधाव वेगात असणाऱ्या क्रेन च्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीमध्ये घडली आहे.  पिंपरी पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. बबन केरू साळवे (वय-६० वर्ष) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बबन हे रस्ता ओलांडून शौचास जात होते. दोन्ही बाजूने वाहने येतात का यांच्याकडे त्यांचे लक्ष होते. अगदीच ते रस्त्या ओलांडणार तेवढ्यात भरधाव वेगात असणाऱ्या क्रेन ने त्यांना जोरात धडक दिली. ते रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून संबंधित क्रेन चालकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण हे करत आहेत.